PM Modi Speech in Rajya Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी दुपारी 2 च्या सुमारास राज्यसभेतील भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंवर जोरदार निशाणा साधला. "या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला प्रचंड त्रास देण्यात आला. आताही तुम्ही काहीही न ऐकण्याच्या उद्देशानेच आला आहात. पण मी देखील यावेळी पूर्ण तयारीने आलो आहे. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले .
"मी खरगेजींचे विशेष आभार व्यक्त करतो. त्यादिवशी मी त्यांचे भाषण ऐकत होतो. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटलं की, लोकसभेत ज्या मनोरंजनाची उणीव भासत होती ती त्यांनी भरून काढली. त्या दिवशी दोन कमांडो आले नव्हते आणि त्यांनी त्या संधीचा पुरेपुर फायदा उचलला. तुम्हाला पश्चिम बंगालमधून विशेष आव्हान मिळाले आहे. काँग्रेस हा पक्ष आता जुना झाला आहे. हा पक्ष स्वातंत्र्यापासूनच संभ्रमात आहे. काँग्रेसच्या काळात देशातील जनता ही नाराज होती आणि आता ते पंतप्रधान मोदींवर प्रश्न उपस्थित करत आहेत", असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.
"ज्या काँग्रेसने देशाला कठीण परिस्थितीत ढकलले, तोच काँग्रेस पक्ष आज भाषणाद्वारे आमच्यावर टीका करत आहे. राष्ट्रीयीकरण करायचे की खासगीकरण हे ठरण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. काँग्रेस हा गोंधळलेला पक्ष आहे. जो काँग्रेस पक्ष 10 वर्षात आपली अर्थव्यवस्था 12 व्या स्थानावरुन 11 व्या स्थानावर आणू शकला नाही, तो आज आमच्यावर टीका करत आहे. तोच काँग्रेस आम्हाला आर्थिक धोरणांबद्दल टोले लगावत आहे." असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.
"ज्या काँग्रेसने ओबीसींना आरक्षण दिले नाही. ज्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातील गरिबांना आरक्षण दिले नाही. ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याच्या योग्य मानले नाही. ज्या काँग्रेसने केवळ त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाच भारतरत्न दिले. तीच काँग्रेस आज आम्हाला सामाजिक न्यायाचा धडा शिकवत आहे. ज्या काँग्रेसला आपल्या नेत्याची हमी नाही, त्यांना आपल्या धोरणांची हमी नाही, तोच काँग्रेस आज मोदींच्या हमीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे." असेही मोदी म्हणाले.
"आम्ही देशाला अनेक संकटातून बाहेर काढले आहे. स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता कोणी वाढवली? तुमच्यावर ब्रिटीशांचा प्रभाव नव्हता तर तुम्ही IPC का बदलला नाही? जर तुमच्यावर ब्रिटीशांचा प्रभाव नव्हता, तर मग देशाचा अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता मांडण्याची परंपरा का सुरु ठेवली? देशाच्या लष्करातील जवानांसाठी युद्ध स्मारक का बांधले नाही?" असा सवाल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला केला.