नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर; कोरोनामुळे निधन झालेल्यांना वाहिली श्रद्धांजली

कोरोना महामारीमुळे निधन झालेल्यांविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावूक झाले.

Updated: May 21, 2021, 04:05 PM IST
नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर; कोरोनामुळे निधन झालेल्यांना वाहिली श्रद्धांजली title=

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे निधन झालेल्यांविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावूक झाले. 'विषाणूमुळे आपल्यातून अनेक प्रियजन दूर गेले आहेत. मी त्यांना श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या कुटूंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो.' असे मोदी यांनी म्हटले आहे. ते वारणसीच्या डॉक्टर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान बोलत होते.

'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकाच वेळी आपण अनेक आघाड्यांवर लढत आहोत. संसर्गदर जास्त आहे. तसेच रुग्ण बऱ्याच दिवसांपासून रुग्णालयात आहेत. आता आपल्याला वाराणसी तसेच पूर्वांचलच्या ग्रामीण परिसरात लक्ष द्यावे लागेल.  'जहा बीमार, वहीं उपचार' आता आपला मंत्र असणार आहे.'  असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

आपल्या संबोधनात मोदी म्हणाले की, 'लसीकरणाला आपल्याला लोकअभियानाचे रुप द्यायला हवे. याआधी यूपीमध्ये मेंदू ज्वरामुळे हजारो लहानगे मृत पावत असत. योगीजी तेव्हा खासदार होते. त्यावरून एकदा त्यांना संसदेत रडू कोसळले होते. योगीजी मुख्यमंत्री झाल्यानंतर भारत सरकारसोबत मिळून त्यांनी मेंदू ज्वराविरोधात अभियान सुरू केले. त्यामुळे आतपर्यंत असंख्य बालकांचे प्राण वाचले आहेत.'

सध्या कोरोनाच्या उपचारासोबतच म्युकरमायकोसीसचे आव्हान भारतासमोर उभे ठाकले आहे. त्यासाठी व्यवस्था तयार करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असेही मोदी यावेळी म्हणाले.