पंतप्रधान नरेंद्र मोदींची यंदाची दिवाळीही जवानांसोबत

दिवाळी जवानांसह साजरी करण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग पाचव्या वर्षीही राखली.

Updated: Nov 7, 2018, 09:05 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींची यंदाची दिवाळीही जवानांसोबत title=

उत्तरकाशी : दिवाळी जवानांसह साजरी करण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग पाचव्या वर्षीही राखली. उत्तराखंडमध्ये भारत चीन सीमेजवळ हर्षिल कॉन्टोनमेंटमध्ये आर्मी आणि आयटीबीपीच्या जवानांसह दिवाळी साजरी केली. हर्षिल कॅन्टोनमेंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आणि लष्करी जवानांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. पंतप्रधानांनी आर्मी आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधला, त्यांना शुभेच्छा दिल्या. युनिटला भेटवस्तूही दिल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्व जवानांना स्वतः मिठाईही भरवली. सीमेवर जवान कर्तव्य कठोरपणे उभे असतात म्हणून १२५ कोटी जनतेच्या आशा आकांक्षा, स्वप्न टिकून आहेत असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.

२०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर मोदींनी दिवाळीत सियाचीन इथल्या तळाला भेट दिली. २०१५ मध्ये पंजाब सीमेवर पंतप्रधान मोदींनी जवानांसह दिवाळी साजरी केली. २०१६ मध्ये पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशात इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपीच्या जवानांसह दिवाळी साजरी केली. त्यानंतर २०१७ साली जम्मू काश्मीरमध्ये संवेदनशील गुरेझ सेक्टरमध्ये पंतप्रधानांनी जवानांसह दिवाळी साजरी केली.

जवानांसह दिवाळी साजरी केल्यावर पंतप्रधान केदारनाथच्या दर्शनासाठी रवाना झाले. केदारनाथ मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते शिवशंकराचं पूजन झालं. जलप्रलयानंतर इथे होत असलेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी फिरून पाहणी केली. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिकांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला. जवानांसह दिवाळी साजरी करण्याची पंतप्रधानांची ही कृती जवानांसाठी निश्चितच प्रेरणादायी होती.