Narendra Modi on Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) राष्ट्रपतींच्या अभिषाणावर (Motion of Thanks to the President's address) भाषण करताना गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांचे वंशज असतानाही नेहरुंचं आडनाव का वापरत नाही अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबाला (Gandhi Family) केली आहे. दरम्यान राज्यसभेत मोदींचं भाषण सुरु असताना विरोधकांकडून 'मोदी-अदानी भाई भाई'च्या (Modi Adani) घोषणा देण्यात येत होत्या. या गोंधळातच नरेंद्र मोदींनी भाषण केलं.
"गांधी-नेहरु यांच्या नावे जवळपास 600 योजना असल्याचं मी वृत्तपत्रात वाचलं. मला कळत नाही की, नेहरुंचे वंशज त्यांचं आडनाव का वापरत नाहीत. जर ते इतके महान होते तर कशाची लाज वाटत आहे?," अशी विचारणा नरेंद्र मोदींनी राज्यसभेत केली.
पंतप्रधान मोदींनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिषाणावर आभार व्यक्त करणारं भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी सध्या हिडनबर्ग रिपोर्टमुळे चर्चेत असणारे गौतम अदानी यांचा उल्लेख टाळल्याने विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. दरम्यान आज नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलण्यासाठी उभे राहिले असता विरोधकांनी अदानींच्या नावे घोषणा देण्यास सुरुवात केली.
विरोधकांच्या 'अदानी अदानी', 'मोदी-अदानी', 'मोदी- अदानी भाई भाई'च्या घोषणाबाजीमध्येच मोदींना आपलं भाषण द्यावं लागलं. नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या घोषणाबाजीवर उत्तर देताना "कमळ उमलण्यात विरोधकांचाही वाटा आहे," असं म्हटलं. "सभागृहामधील काही लोकांचं वागणं निराशाजनक आहे," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
"काँग्रेसने कारभार करताना खड्डे पाडून ठेवले आहेत. काँग्रेसने देशाची 6 दशकं वाया घालवली आहेत. 60 वर्ष काँग्रेसनं खड्डेच खड्डे केले होते. जेव्हा काँग्रेस खड्डे खोदत होती तेव्हा इतर देश प्रगती करत होते. काँग्रेसच्या लोकांनी जनतेच्या समस्या सोडवल्या नाहीत," अशी टीका मोदींनी केली.
"आम्ही समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने काम केलं. देशातील व्यवस्थेवर लोकांचा विश्वास वाढला आहे. गावांमध्ये 22 तास वीज पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनता काँग्रेसला पाहतेय आणि शिक्षा देतेय. आम्ही देशातील लोकांचा विश्वास जिंकला आहे. आम्ही राजकीय फायदा-तोटा न पाहता निर्णय घेतो. आम्ही देशामध्ये नवीन संस्कृती रुजवत आहोत. ही संस्कृती म्हणजे सर्वांना होणारा फायदा हीच खरी हीच खरी धर्मनिरपेक्षता. काँग्रेसला जनतेनं अनेकदा नाकारलं आहे. काँग्रेस आणि सहकारी पक्ष कट रचणं थांबवत नाही," असंही मोदी म्हणाले. "विचार चांगले असतील, काम करण्याची इच्छा असेल तर एवढी मेहनत करावी लागत नाही. आधी काम केलं असतं तर आज एवढी मेहनत करावी लागली नसती," असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला.