नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. गुरुवारी पंतप्रधानांनी तुमकूरमध्ये सिद्धगंगा मठाचे दर्शन घेतल्यानंतर जनसभेला संबोधित केले. यावेळी देशातील ६ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी योजने अंतर्गत डिसेंबर महिन्यापर्यंत १२ हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना भेट दिली आहे. या दरम्यान ८ कोटी व्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले.
सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकर्यांच्या परिवाला वार्षिक सहा हजार रुपये हस्तांतरित केले जातात. गेल्या डिसेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना हा लाभ मिळू लागला आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. पश्चिम बंगालचे शेतकरी यापासून वंचित राहीले आहेत.
नव्या वर्षाच्या सुरुवातीस शेतकऱ्यांचे दर्शन होणे ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले. देशातील १३० कोटी जनतेतर्फे मी प्रत्येक शेतकऱ्यांला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.
आज ८ कोटी व्या शेतकरी बांधवाच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. तसेच आतापर्यंत देशातील ६ कोटी शेतकरी परिवारांच्या खात्यात १२ हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.
२०१९चे अनेक क्षण आपल्या सोबत आहेत. आता आपण केवळ नव्या वर्षात प्रवेश करत नाही तर एका नव्या दशकात प्रवेश करत आहोत. हे दशक भारताच्या तरुणाचं असेल. एकविसाव्या शतकात जन्मलेले लोक देशाच्या विकासाला गती देण्यासाठी सक्रिय भूमिका निभावतील, असे सांगत पंतप्रधान मोदींनी देशाला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. देशातील युवक अराजकतेचा द्वेष करत असल्याचंही मोदी म्हणाले. यावेळी बोलताना मोदींनी स्वामी विवेकानंद यांचादेखील उल्लेख केला. स्वामी विवेकानंद यांचा तरुण पिढीवर विश्वास असल्याचंही ते म्हणाले.