आपण इतके सक्षम आहोत की, सगळ्यांनीच निश्चिंत राहा - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख सीमा वादानंतर भारत आणि चीन यांच्यात मोठा तणाव वाढला असताना प्रथमच जाहीर भाष्य केले आहे.

Updated: Jun 20, 2020, 02:28 PM IST
आपण इतके सक्षम आहोत की, सगळ्यांनीच निश्चिंत राहा - पंतप्रधान मोदी title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख सीमा वादानंतर भारत आणि चीन यांच्यात मोठा तणाव वाढला असताना प्रथमच जाहीर भाष्य केले आहे. चीन हिंसक झडपेनंतर मोदी यांनी जाहीर भूमिका मांडली नव्हती. यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले होते. काँग्रेसने जाहीर टीका केली होती. त्याला उत्तर दिले आहे. आजच्या घडीला आपण इतके सक्षम आहोत, की आपल्या एक इंच जमीनवरही कोणी वाकडी नजर टाकू शकत नाही. सगळ्यांनीच निश्चिंत राहा, असे देशवासीयांना आश्वासित केले.

आत्तापर्यंत ज्या कोणाला आपण जाब विचारू शकत नव्हतो, अडवू शकत नव्हतो, आता अशा सगळ्यांना आपले जवान पावलोपावली अडवू शकत आहेत, जाब विचारू शकत आहेत. नव्या पायाभूत सोयीसुविधांमुळे, विशेषतः LAC क्षेत्रात देखरेख करण्याची आपली क्षमताही वाढली आहे. देखरेखीची क्षमता वाढली असल्यानं आपण अधिक सतर्कही झालो आहोत आणि LAC क्षेत्रात होणाऱ्या घडामोडीही वेळेत कळू लागल्या आहेत. 

गरीब कल्याण रोजगार अभियान

५० हजार कोटी रुपयांची 'गरीब कल्याण रोजगार अभियान' देशातल्या कामगार-श्रमिकांना समर्पित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या अभियान योजनेचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी भारत-चीन वादानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला, आपल्यावतीनं मौल्यवान सूचना केल्या, त्यासाठी मी सर्व पक्षांचे, आपल्या सगळ्यांचे अंतःकरणापासून आभार मानतो, असे यावेळी नरेंद्र मोदी म्हणालेत.

चीनने LAC वर जे केलं त्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे, आणि त्याबाबत संपूर्ण देशाला रागही वाटतो आहे, हे खरंच आहे. शांतता आणि मैत्रीपूर्ण वातावरण कायम राहावं हेच भारताचं धोरण आहे, मात्र त्याचवेळी भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणं हाच आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. आपण सगळ्यांनीही हीच भावना बोलून दाखवली आहे. सध्याची स्थिती लक्षात घेऊन आम्ही सैन्याला त्यांना योग्य वाटणारे निर्णय घेण्याची मोकळिक दिली आहे, आणि त्याचवेळी राजनैतिक माध्यमातूनच चीनसमोर आपली भूमिकाही स्पष्टपणे मांडली आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास सक्षम 

आजच्या घडीला आपण इतके सक्षम आहोत, की आपल्या एक इंच जमीनवरही कोणी वाकडी नजर टाकू शकत नाही. आजच्या घडीला भारताचं सैन्य अनेक क्षेत्रात एकाचवेळी चाल करून जाण्याइतकं सक्षम आहे. मी एवढं नक्की सांगतो की आपलं सैन्यदल देशाच्या रक्षणात कुठेही कमी पडत नाही आहे, त्याबाबत आपण सगळ्यांनीच निश्चिंत रहावं.आपली नौदल - पायदळ आणि वायुदल देशाच्या रक्षणासाठी जे जे करणं आवश्यक वाटतंय, त्या सर्व गोष्टी करत आहेत.  

मी तुम्हा सगळ्यांना, सर्व पक्षांना पुन्हा एकदा विश्वासानं सांगतो, की, आपल्या देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी आपलं सैन्य पूर्णतः सक्षम आहे, त्याबाबत निश्चिंत असावं. आम्ही त्यांना योग्य ती कारवाई करण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे.  गेल्या काही वर्षात आम्ही आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित राहाव्यात यासाठी सीमाक्षेत्रात पायाभूत सुविधा विकसित करण्याला प्राधान्य दिलं आहे. याशिवाय सैन्याला लढाऊ विमानं, आधुनिक हेलीकॉप्टर, मिसाइल डिफेन्स सिस्टम मिळावी यावरही आम्ही खूप भर दिला आहे, असे मोदी म्हणालेत.

भारत दबावासमोर झुकलेला नाही 

व्यापार असो, कनेक्टिविटी असो, दहशतवादाला प्रत्युत्तर देणं असो, याबाबत भारत कधीही बाहेरच्या दबावासमोर झुकलेला नाही.देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीनं काही आवश्यक गोष्टी करायच्या असतील, सोयी सुविधा उभारायच्या आहेत. वाढत असलेल्या पायाभूत सोयी सुविधांमुळे आता तिथल्या कठीण परिस्थितीतही जवानांना तिथे तैनात करण्यात मदत होते आहे. सहकाऱ्यांनो,देशाचं हित, देशवासियांचं हित हेच आपल्या सगळ्यांच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर आहे, असे मोदी म्हणाले.