PM Modi in kanyakumari : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election 2024) अखेरच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान आणि त्यानंतरचा निकाल यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीवर संपूर्ण देशाच्या आणि जगाच्याही नजरा खिळल्या आहेत. सध्याच्या घडीला कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधान मोदी यांच्या ध्यानधारणेच्या सत्राची सुरुवात झाली असून, गुरुवारी सायंकाळपासून त्यांनी या सत्राची सुरुवात केली.
30 मे रोजी पंतप्रधानांनी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी ध्यानसाधनेची सुरुवात केली. त्या क्षणापासून 1 जून रोजी सायंकाळपर्यंत त्यांची ही साधना सुरु राहणार आहे. ज्या शिळेवर स्वामी विवेकानंद यांनी बसून ध्यानसाधना केली होती त्याच शिळेवर बसून पंतप्रधानही ध्यानधारणा करत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
ध्यानधारणेच्या या संपूर्ण सत्रादरम्यान पंतप्रधान काही नियमांचं पालन करत असून, यादरम्यान ते फक्त द्रव्य पदार्थांचं सेवन करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ते नारळपाणी आणि द्राक्षांचा ज्यूस घेचत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपूर्ण अध्यात्मिक प्रवात पंतप्रधान मौन राहत असून, ध्यान कक्षातून ते बाहेर येणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
शुक्रवारी पंतप्रधानांच्या ध्यानसाधनेदरम्यानचा एक व्हिडीओ वृत्तसंस्थेनं शेअर केला, जिथं ते केशरी वस्त्रांमध्ये कपाळी भस्म आणि चंदनाचा टिळा लावून हाती रुद्राक्ष माळ घेत ध्यानस्थ बसल्याचं पाहायला मिळालं. विवेकानंदांच्या प्रतिमेपुढं दोन्ही हात जोडून ध्यानसाधनेत रमलेल्या पंतप्रधानांचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला.
#WATCH | Tamil Nadu | PM Narendra Modi meditates at the Vivekananda Rock Memorial in Kanniyakumari, where Swami Vivekananda did meditation. He will meditate here till 1st June. pic.twitter.com/cnx4zpGv5z
— ANI (@ANI) May 31, 2024
कडेकोट बंदोबस्त
तिथं देशाचे पंतप्रधान ध्यानस्थ असतानाच विवेकानंद रॉक मेमोरियल आणि नजीकच्या सर्व परिसरांमध्ये सुरक्षेचे चोख बंदोबस्त करण्यता आले असून, शनिवारपर्यंत येथील समुद्रकिनाऱ्यावर सामान्य पर्यटकांना बंदी असेल. याशिवाय खासगी नौकांना या हद्दीमध्ये प्रवेश नाकारण्यात येत असून, देशाच्या या दक्षिणेकडील किनारपट्टी भागात या क्षणाला जवळपास 2 हजारहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.