पीयूष गौड, झी मीडिया, उत्तर प्रदेश : तुमची मुलं कायम मोबाईवर (Mobile) गेम खेळत असतात का...? तसं असेल तर सावधान. कारण एक अल्पवयीन मुलाला मोबाईलवर गेम खेळता खेळता चक्क धर्मांतर (Conversion) करण्यास भाग पाडण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमधील ही धक्कादायक घटना आहे. ऑनलाईन गेम्सच्या आडून लहान मुलांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचं षडयंत्र कसं आखण्यात येतंय, याची धक्कादायक कहाणी समोर आली आहे. गाझियाबादमधल्या (Gaziabad) 17 वर्षांच्या जैन धर्मीय मुलानं गुपचूप इस्लाम धर्माचा स्वीकार केलाय. त्याच्या घरच्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. गाझियाबादच्या सेक्टर 23 मधल्या एका मशिदीत हा तरुण लपून छपून नमाज पढायला जायचा.
मुलांच्या धर्मांतराचा 'गेम'
हा मुलगा 5 वेळा जीमला जाण्याच्या बहाण्यानं गायब असायचा, कुटुंबीयांनी चौकशी केली तेव्हा तो मशिदीला नमाज पढायला जात असल्याचं आढळलं. आपण मुस्लीम धर्म स्वीकारल्याची कबुली त्यानं दिलीय. याप्रकरणी पीडित मुलाच्या तरुणानं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाच्या मोबाईल फोनची तपासणी केली तेव्हा, धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आला.
मुलांच्या धर्मांतराचा 'गेम'
हा मुलगा मुंबईतील बद्दो नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. ऑनलाईन गेमिंग अॅपवर तो दिवसभर गेम खेळत असायचा. गेमिंग अॅपसाठी त्यानं डिजिटल करन्सी विकत घेतली होती. डिजिटल करन्सीसाठी त्यानं बद्दोला ऑनलाईन पेमेंट केलं होतं या धर्मांतरामागं मशिदीतल्या मौलानाचा हात असल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबानं केलाय. तर सायबर पोलिसांच्या मदतीने याप्रकरणी अधिक तपास केला जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिलीय.
या मुलाच्या मोबाईलमध्ये फरार इस्लामी कट्टरपंथी झाकीर नाईक याचे अनेक व्हिडिओही सापडले. या व्हिडिओंच्या आधारे या मुलाचा ब्रेनवॉश करण्यात आल्याचा संशय आहे. सध्या गाझियाबाद पोलीस मुंबईतल्या या बद्दोचा शोध घेतेय. लहान मुलांना धर्मांतराच्या जाळ्यात अडकवणारी एखादी गँग सक्रीय आहे का? या गँगनं नेमकं किती मुलांना शिकार बनवलंय? याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय.
ऑनलाईन गेमचा नाद
कोरोना काळात मुलं घरात बसली आणि शिक्षणही ऑनलाईन होऊ लागलं. त्यामुळे लहान मुलांच्या हातातही मोबाईल आले. ऑनलाइन अभ्यास करता करता मुलं ऑनलाइन गेमच्या नादी लागली. अनेक मुलं ऑनलाई गेमच्या आहारी गेली. ऑनलाइन जुगाराच्या नादी लागून आर्थिक नुकसान करुन घेत असल्याचं चित्र आहे. ऑनलाईन जुगाराला बळी पडून आपल्या वस्तू, घरदार, शेती-वाडीही गहाण टाकत असल्याचं भीषण चित्र सध्या पाहिला मिळत आहे.