महागाईचा उडणार भडका, पुन्हा पेट्रोल-डिझेल दरात वाढ

 सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. 

Updated: Jun 19, 2020, 08:56 AM IST
महागाईचा उडणार भडका, पुन्हा पेट्रोल-डिझेल दरात वाढ  title=

मुंबई : लॉकडाऊन काळात सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आता महागाईचा भडका उडण्याचे संकेत मिळत आहेत. देशातील प्रमुख महानगरांत पेट्रोलचे दर हे ८० रुपयांच्यापुढे गेले आहेत. तेरा दिवसात ७ रुपयांनी पेट्रोल महाग झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवरील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा बोझा सतत वाढत आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यात इंधन वाढ होत असल्याने महागाईत अधिक भर पडले. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले आहेत. पेट्रोलच्या दरात ०.५६ रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमती ०.६३ रुपयांनी वाढल्या आहेत. बुधवारी पेट्रोलचा दर वाढून ७८.३७ रुपये झाला. तर डिझेल दरही वाढविण्यात आला आहे. डिझेलची किंमत प्रति लिटर ७७.०६ रुपयांवर पोहोचली.

लॉकडाऊनमुळे सरकारचा जीएसटी आणि इतर कर महसूल घटल्याने आता इंधन विक्रीतून जास्तीत जास्त कर वसूल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यावरुन आता राजकारण अधिक पेटण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात देखील वाढ केली. यामुळे विमान तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी मुंबईत पेट्रोल ८५.२१ रुपये झाले. गुरुवारी पेट्रोलचा भाव ८४.६६ रुपये होता. त्यात ५५ पैशांची वाढ झाली. आज डिझेलचा भाव प्रती लीटर ७५.५३ रुपये झाला आहे. यापूर्वी मुंबईत पेट्रोलने ९१ रुपयांचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत पेट्रोलने ८५ ची पातळी ओलांडली आहे. आज पेट्रोलचा एक लीटरचा भाव ८५.२१ रुपयांवर गेला आहे. गेल्या २० महिन्यांतील हा सर्वाधिक दर आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये पेट्रोल ८५ रुपयांवर गेले होते. दिल्लीत पेट्रोलचा दर ७८.३७ रुपये झाला आहे. गुरुवारी तो ७७.८१ रुपये झाला आहे. आज त्यात ५६ पैशांची वाढ झाली. आजचा डिझेलचा भाव ७७.०६ रुपये झाला आहे. त्यात ६३ पैशांची वाढ झाली.

कोलकातामध्ये पेट्रोल ८० रुपयांवर पोहोचले आहे. आज कोलकातामधील पेट्रोलचा भाव ८०.१३ रुपये झाला आहे. कोलकातामध्ये डिझेल ७२.५३ रुपये झाला. गुरुवारी तो ७१.९६ रुपये होता.चेन्नईत पेट्रोल ८१.८२ रुपयांवर गेले आहे. चेन्नईत डिझेलचा दर ७४.७७ रुपये झाला आहे. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ३८ डाॅलर आहे.