मुंबई : तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर केल्या आहेत. बुधवारच्या दरवाढीनंतर आज गुरुवार 17 जूनला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित घट झाली आहे. सुमारे दीड महिन्यांपर्यंत सातत्याने वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी स्तरावर आहेत. इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांवरील खर्च आता वाढला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याची सुरवात 4 मेपासून सुरू झाली होती. पेट्रोलची किंमत शंभरी पार झाल्यानंतर काही शहरांमध्ये डिझेलनेही शतक गाठले आहे.
एकीकडे या इंधनाच्या दर वाढीमुळे देशातील सामान्य जनतेचे महिन्याचे बजेट कोलमडू लागले आहे. तर दुसरीकडे, सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींसाठी कच्च्या तेलाच्या दर वाढीला दोष देत आहे. भारत आपल्या खनिज तेलाच्या आवश्यकतेच्या 80 टक्क्यांहून अधिक आयात करतो. अलीकडेच सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेले व्हॅट कमी करण्यास राज्यांना सांगितले आहे.
आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर, दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.66 रुपये तर डिझेलची किंमत 87.41 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल आज 102.82 रुपये, तर डिझेलची किंमत 94.84 रुपये आहे.
आज कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटरची किंमत 96.58 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 90.25 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अनुक्रमे 97.91 आणि 92.04 रुपये आहेत.
कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये किंचित घट झाली आहे. बुधवारी WTI क्रूड ऑइल बेंचमार्क 0.85 टक्क्यांनी घसरून 72.54 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत समान म्हणजेच 0.85 टक्क्यांनी घटून 73.76 डॉलर प्रति बॅरल आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर आज संसदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस विषयक स्टँडिंग कमेटीची बैठक आज होणार आहे. या समितीने पेट्रोलियम मंत्रालय, IOC, BPCLआणि HPCLच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे.
बैठकीत सद्यस्थितीतील किंमती आणि मार्केटिंग संबधीत माहिती मागवली आहे. नैसर्गिक गॅस च्या सध्याच्या किंमती-मार्केटिंग विषयावर माहिती देखील मागितली जाईल. ही बैठक सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. या बैठकीनंतर तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर होण्याची अशा आहे.