राफेल प्रकरणी दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल मागे घ्यावा आणि या प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी घ्यावी.

Updated: Jan 2, 2019, 05:31 PM IST
राफेल प्रकरणी दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका title=

नवी दिल्ली - राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा, यासाठी परत एकदा याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ही याचिका दाखल केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राफेलचा मुद्दा पुढील काळात आणखी तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस सातत्याने या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे. बुधवारीही याच मुद्द्यावरून राहुल गांधी आणि अरुण जेटली यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. 

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल मागे घ्यावा आणि या प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी घ्यावी. याचिकाकर्त्यांना पुन्हा त्यांची बाजू मांडण्याची तोंडी संधी द्यावी, अशी मागणी तिन्ही याचिकाकर्त्यांनी केली आहे. प्रशांत भूषण यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने दिलेल्या चुकीच्या माहितीवर सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणात निकाल दिला आहे. निकालामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा याचिकावर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अनेक नवीन मुद्दे आणि पुरावे पुढे आले आहेत. त्यांचाही विचार केला गेला पाहिजे, असेही याचिकेमध्ये म्हटले आहे.