इस्लामाबाद - पाकिस्तानमधील सिंध प्रांतात राहणारी सुमन पवन बोडानी हिंदू समुदायातील पहिली महिला न्यायाधिश बनली आहे. या परिक्षेत सुमनने 54वा नंबर पटकावला आहे. सुमन सिंध प्रांतातील कंबर शाहदादकोट भागात राहत असून न्यायाधिश म्हणून तिची यात भागात नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील सर्वांचाच विरोध असताना सुमनने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुमन पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायात मोडते. या समुदायात महिला डॉक्टर किंवा शिक्षक बनतात. परंतु सुमनला कायदेपंडीत व्हायचे होते. सुमनच्या या निर्णयामुळे तिला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. समाजातील अनेकांनी तिला विरोध केला असला तरी तिच्या कुटुंबीयांनी तिला यासाठी सर्वोतोपरी पाठिंबा दिला. सुमनने 'माझ्या कुटुंबीयांनी लोक काय म्हणतील? याकडे लक्ष दिले नाही. सर्वांनी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मदत केली' असल्याचे तिने सांगितले.
सुमनने हैदराबाद येथून 'एलएलबी' केले. त्यानंतर 'शहीद जुल्फिकार अली भुट्टो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नोलॉजी' कराची येथून तिने 'एलएमएम'ची पदवी घेतली. 'एलएमएम'नंतर तिने निवृत्त जस्टिस रशीद रिजवी यांच्या लॉ फर्ममध्ये दोन वर्षे प्रॅक्टिस केली. सुमनचे वडिल पवन कुमार बोदानी यांची सुमनने वकीली करण्याची इच्छा होती. 'सुमनला शाहदादकोटमध्ये गरीब लोकांना मोफत कायदेशीर मदत करायची आहे. तिने आव्हानात्मक व्यवसाय निवडला असला तरी मला पूर्ण खात्री आहे ती संपूर्ण इमानदारी आणि मेहनतीने यश मिळवेल' असे पवन बोदानी यांनी सांगितले.
सुमनचे वडिल पवन कुमार बोदानी डोळ्यांचे डॉक्टर आहेत. सुमनची मोठी बहीण डॉक्टर तर दुसरी बहीण चार्टेड अकाउंटेंट आहे. सुमनचे दोन्ही भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. 'मुलांना शिक्षण देणे हे महत्त्वाचे असून याबाबत हिंदू समाजातील लोकांनी समजून घेतले पाहिजे. मला ज्या लोकांना कायद्याबाबत काही माहित नाही अशा गरीब लोकांची मदत करायची' असल्याचे सुमनने म्हटले आहे. पाकिस्तानात जवळपास 2 टक्के हिंदू लोक आहेत. याआधीही या भागात हिंदू समुदायाचे जज झाले होते परंतु, सुमनने पहिल्यांदाच हिंदू महिला जज बनण्याचा किताब पटकावला आहे.