'जैश'चे मुख्यालय 'पाक'च्या नियंत्रणात, दहशतवादी मसूदला वाचवण्याचा प्रयत्न

 जैशचे मुख्यालय पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये आहे.

Updated: Feb 22, 2019, 09:06 PM IST
'जैश'चे मुख्यालय 'पाक'च्या नियंत्रणात, दहशतवादी मसूदला वाचवण्याचा प्रयत्न title=

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. त्यानंतर जैश आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानची कोंडी करण्याचे भारताने जोरदार प्रयत्न केले आहेत. जैश ए मोहम्मदचा एक सूत्रधार रशीद गाझी याचा भारतीय जवानांनी खात्मा केला. भारत आणखी जोरदार कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने जैश ए मोहम्मद चे मुख्यालय स्वत:च्या नियंत्रणाखाली घेतले आहे. जैशचे मुख्यालय पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये आहे. पाकिस्तानच्या या कारवाईला नवे नाटकं मानले जात आहे. खरंतर पाकिस्तान मसूद अजहरला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. बहावलपूर येथेच पाकिस्तानी सैन्याचे 31 कोर मुख्यालय आहे.

पाकची सुरक्षा 

पंजाब सरकारने 'जैश ए मोहम्मद'चे मुख्यालय आपल्या ताब्यात घेतल्याचे पाकिस्तानच्या गृह मंत्रालय प्रवक्त्याने सांगितले. पाकने आपला एक प्रशासकही तिथे नेमल्याचे ते म्हणाले. ही कारवाई गुरूवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एनएससी बैठकीच्या निर्णयानंतर केली गेली. सध्या 600 विद्यार्थी या मुख्यालयात शिकत आहेत आणि 70 शिक्षक तैनात आहेत. पंजाब पोलीस या कॅंम्पसला सुरक्षा देत आहे.

मसूद सुरक्षित 

मसूद अजहर याच संघटनेचा म्होरक्या आहे. भारताविरुद्ध गरळ ओकण्यात आणि पाकिस्तानमधील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम मसूद अजहर गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. चीनकडून मात्र याला विरोध होत आहे. पाकिस्तानही मसूद अजहरला पाठीशी घालतना दिसत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने 'जैश ए मोहम्मद' चा म्होरक्य मसूद अजहरला बहावलपूर हेडक्वार्टरमधून हटवून दुसऱ्या ठिकाणी पाठवले आहे. पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला रावळपिंडीमधील सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे मुख्यालय या ठिकाणी आहेत.

सुरक्षिततेचा इशारा 

भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद येत्या काळात जम्मू आणखी काही आत्मघाती हल्ले घडवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. गुप्तचर यंत्रणांकडून नुकतच मिळालेल्या माहितीनुसार सध्या 'जैश...' आणखी एक मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संबंधित धागेदोऱ्यांच्या बळावर आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न गुप्तचर यंत्रणांकडून करण्यात येत आहे.