जबलपूर : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शुक्रवारी पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन दिल्यास आणि दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचे काम चालूच ठेवले तर भारतातून पाकिस्तानच्या नद्यांना पाण्याचा एक थेंबही मिळणार नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी जबलपूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
नितिन गडकरींनी अंतर्गत आणि बाह्य सुरक्षिततेबद्दल कोणतेही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले. युद्धात आपण भारताचा पराभव करू शकत नसल्याचे पाकिस्तानला समजले आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पाठवून एक 'प्रॉक्सी वॉर' सुरू केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. परंतु जे दहशतवादी येतात ज्यांना आम्ही पकडतो ते पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यांच्याजवळ मोबाईल फोन आहेत. पाकिस्तान सैन्याद्वारा दिली गेलेली हत्यारे आहेत. ऐवढं सारं असूनही पाकिस्तान खोटे बोलत असल्याचे गडकरी यांनी म्हटले.
१९६० साली भारत आणि पाकिस्तानमध्ये इंडस ट्रीटी नावाचा करार झाला होता. भारत आणि पाकिस्तानदरम्यान सहा नद्या होत्या. तीन नद्या पाकिस्तान आणि तीन नद्या भारताला मिळत होत्या आणि आपल्या अधिकाराचे पाणीही पाकिस्तानमध्येच जात होते. पाकिस्तानविरुद्ध निर्णय घेण्यात आल्यानंतर केंद्राकडूनही त्याचा स्वीकार करण्यात आला. आपल्या तीन नद्यांच्या अधिकाराचे पाणी पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानला देण्यात येणार आहे. झेलम, चिनाब या ज्या बाकी तीन नद्या आहेत त्यादेखील आपल्या भारतातूनच जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तान हमें मजबूर ना करें.. pic.twitter.com/uLNGlCWS92
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 22, 2019
इंडस ट्रीटी करारात असे लिहिण्यात आले आहे की, दोन्ही देशांमध्ये प्रेम, सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढावेत. परंतु आज त्यांचे सहकार्य, मैत्री कुठे गेली? असा सवाल करत त्यांनी पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देण्याचे काम केले तर पाकिस्तानात पाण्याचा एक थेंबही येणार नाही. मैत्री, प्रेम, सहकार्य या गोष्टी दोघांच्या सहयोगाने होत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.