शौक बडी 'महंगी' चीझ है... पानाचा विडा खिशाला परवडेना

देशाच्या संस्कृतीशी नातं सांगणारं पान अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय... 

Updated: Dec 28, 2019, 10:51 PM IST
शौक बडी 'महंगी' चीझ है... पानाचा विडा खिशाला परवडेना title=

कृष्णात पाटील / विशाल करोळे, झी २४ तास, मुंबई / औरंगाबाद : चवीनं पान खाणाऱ्यांसाठी एक महागडी बातमी... आता तुमचे ओठ लाल करणारं पान महागणार आहे... किंबहूना काही ठिकाणी ते महागलंही आहे, कारण परराज्यातून येणाऱ्या पानाचा पुरवठा कमी झाल्यानं तुटवटा निर्माण झाला आहे. त्यामुळं नाईलाजानं पान विक्रेत्यांनाही किमती वाढवाव्या लागल्या आहेत. 

देशाच्या संस्कृतीशी नातं सांगणारं पान अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय... त्यातल्या त्यात 'कलकत्ता पान' म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेकांचं लाडकं... मात्र, आता पानाच्या वाढलेल्या किंमतींमुळे तोंडातलं पान रंगेनासं होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये पानाच्या दरात जवळजवळ ५० टक्क्यांची वाढ झालीय. त्यामुळे साधारणतः २० रुपयांना मिळणारं कलकत्ता मसाला पान ३० रुपयांवर गेलंय.

पानांची आवक घटल्यामुळे पानांचा शेकडा दर ६०० रुपयांवरून थेट बाराशे रुपयांवर गेलाय. त्यामुळे पानाचे दर वाढवण्याशिवाय गत्यंतर उरलं नसल्याचं पानवाले सांगत आहेत. पानाचे दर वाढल्यामुळे नाईलाजानं भाववाढ करावी लागल्याचं मुंबईमधील ब्रीच कँडीच्या प्रसिद्ध मुच्छड पानवालाचे भरतकुमार तिवारी सांगतात. फोर्टच्या 'वोलगा पानवाला'चे जगत नारायण सिंह मात्र दर फार वाढवले तर व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करतात. 

औरंगाबादचे शरफूभाई दिवसाला १ हजारावर पानं विकतात... त्यांची पान बनवण्याची पद्धत राज्यात प्रसिद्ध आहे. त्यांनाही दर वाढवावे लागलेत. 

पश्चिम बंगालमध्ये आलेल्या वादळामुळे पानमळे उद्धस्त झालेत. त्यामुळे आवक घटल्यानं दरवाढ झाल्याचं, पानव्यापारी अन्वर तांबोळी यांनी म्हटलंय. 

अर्थात, पानाच्या शौकिनांना वाढलेल्या दरांमुळे फारसा फरक पडलेला नाही. 'शौक बडी चीझ है...' आणि एकदा शौक करायचा म्हटलं की किंमतीचं काय?