जत्रेतील ड्रॅगन झोपाळा तुटला, तरुणीचा जागीच मृत्यू; चार महिन्यांनंनतर होणार होते लग्न

Trending News In Marathi: जत्रेतील आकाशपाळणा तुटून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 31, 2024, 04:30 PM IST
जत्रेतील ड्रॅगन झोपाळा तुटला, तरुणीचा जागीच मृत्यू; चार महिन्यांनंनतर होणार होते लग्न  title=
one Girl died and 4 injured due to swing broke in jatra in bihar

Trending News In Marathi: जत्रेतील आकाशपाळणा तुटून झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर, तीन तरुणी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. बिहारच्या मोतिहारीमध्ये भरलेल्या जत्रेत ही घटना घडली आहे. कल्याणपुर ठाणे क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून एक महायज्ञ चालु होता. त्यासाठीच त्या परिसरात एक जत्रा भरलेली होती. जत्रेत वेगवेगळ्या प्रकारचे आकाशपाळणेदेखील लावण्यात आले होते. जत्रा पाहण्यासाठी काही मुलीदेखील आल्या होत्या. त्याचवेळी ही गंभीर घटना घडली आहे. 

कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांवरुन, आकाशपाळण्याच्या संचालकामुळंच ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन अन्य तरुणी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. जत्रेचे आकर्षण वाढवण्यासाठी आणि इथे आलेल्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे आकाशपाळणे लावण्यात आले होते. एक ड्रॅगन पाळणादेखील लावण्यात आला होता. याच पाळण्याचा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रॅगन पाळणा एकमेकांना धडकला आणि त्यामुळं तुटून खाली कोसळला. त्यामुळं सगळ्यात वर बसलेल्या चार मुली गंभीररित्या जखमी झाल्या. यातील एका मुलीचे काहीच महिन्यात लग्न होते. तिचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला आहे. मृत मुलीची ओळख प्रिया कुमारी नावाने पटली आहे. तर, तिच्यासोबत आलेल्या इतर तीन मुली गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. पाळणा तुटून झालेल्या दुर्घटनेमुळं जत्रेत एकच गोंधळ उडाला होता. मुलींना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी प्रियाला मृत घोषित केले. 

जत्रा आणि पाळण्याच्या संचालकांवर बेजाबदारीचा आरोप 

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी घटनेची माहिती घेत जखमी व मृत मुलीच्या पालकांची भेट घेतली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देत संबंधीत घटनेविरोधात पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे तर, मृत मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी जत्रा आणि पाळण्याच्या संचालकांवर व पोलीस प्रशासनांवरही बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे.