गुरु असा असेल तर शिष्य कसा निघेल; जेटलींचा राहुल गांधी-पित्रोदांना टोला

काँग्रेस आणि पाकिस्तानलाच भारतीय वायूदलाचा एअरस्ट्राईक चुकीचा वाटतो

Updated: Mar 22, 2019, 02:46 PM IST
गुरु असा असेल तर शिष्य कसा निघेल; जेटलींचा राहुल गांधी-पित्रोदांना टोला title=

नवी दिल्ली: ज्या लोकांना भारत समजलाच नाही ते लोक आज देशाच्या सुरक्षा धोरणाविषयी बोलत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी सॅम पित्रोदा यांना लक्ष्य केले. सॅम पित्रोदा यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारतीय वायूदलाने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एअर स्ट्राईकमध्ये खरंच ३०० दहशतवादी ठार झाले असतील तर सरकारने पुरावे सादर करावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. यानंतर भाजपचे नेते पित्रोदा यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर अरुण जेटली यांनी पित्रोदा यांच्यावर टीका करताना म्हटले की, ज्यांना भारत समजला नाही, ते आज देशाच्या सुरक्षा धोरणावर भाष्य करत आहेत. जर गुरुच असा असेल तर त्याचा शिष्य किती बिनकामाचा निघेल. आज देश त्याचीच शिक्षा भोगत आहे, असा टोला जेटलींनी राहुल गांधी यांना उद्देशून लगावला.

फक्त काँग्रेस आणि पाकिस्तानलाच भारतीय वायूदलाचा एअरस्ट्राईक म्हणजे चूक वाटत आहे. उर्वरित जग दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे पित्रोदा यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचेही जेटली यांनी सांगितले. 

पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच ट्विट करून पित्रोदा यांच्या विधानावर तोफ डागली. मोदींनी म्हटले आहे की, गांधी घराण्याचे निष्ठावंत सॅम पित्रोदा यांनी बालाकोट येथे भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस अध्यक्षांच्या प्रमुख मार्गदर्शकांपैकी एक असणाऱ्या सॅम पित्रेदा यांनी भारतीय सैन्यदलावर अविश्वास दाखवून पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवसाची एकप्रकारे समर्पक सुरुवात केल्याचा उपरोधिक टोलाही मोदींनी लगावला.