Omicron in India : आज omicron च्या 14 रुग्णांची नोंद, पाहा देशात एकुण रुग्णांची संख्या किती

देशात ओमायक्रॉन व्हेरिएंट आता तब्बल 11 राज्यांमध्ये पसरला आहे

Updated: Dec 16, 2021, 10:52 PM IST
Omicron in India : आज omicron च्या 14 रुग्णांची नोंद, पाहा देशात एकुण रुग्णांची संख्या किती title=

Omicron Cases Updates :  देशात ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लागण होण्याऱ्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट आता 11 राज्यांमध्ये पसरला आहे. बुधवारी केरळमध्ये (Keral) ओमायक्रॉनचे चार, महाराष्ट्रात (Maharashtra) चार, तेलंगणात (Telangana) दोन तर पश्चिम बंगाल (West Bangal) आणि तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) प्रत्येकी एक असे एकूण 12 रुग्ण आढळले होते.

आज कर्नाटकात (Karnataka) पाच, दिल्ली (Delhi) आणि तेलंगणामध्ये (Telangana) प्रत्येकी चार आणि गुजरातमध्ये (Gujrat) ओमायक्रॉनचं एक प्रकरण नोंदवलं गेलं आहे. यामुळे देशातील एकूण ओमायक्रॉन संक्रमित लोकांची संख्या 86 वर पोहोचली आहे.

कर्नाटकात पाच नवे रुग्ण
कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणं वाढू लागली आहेत. राज्यात गुरुवारी पाच ओमायक्रॉन बाधित आढळून आले अशी माहिती कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ.सुधाकर के यांनी दिली. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकात ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता आठ झाली आहे. आज सापडलेल्या पाचही नवीन ओमिक्रॉन बाधित रुग्णांना कोविडशील्ड लसीचे दोन्ही डोस देण्यात आल्याची माहिती कर्नाटकच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

तेलंगणात 4 रुग्णांची नोंद
तेलंगणामध्ये ओमायक्रॉनच्या चार नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. तेलंगणाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये चार रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली. आता तेलंगणामध्ये ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या सात झाली आहे.

दिल्लीत ओमायक्रॉनचे 10 रुग्ण
दिल्लीत ओमायक्रॉन बाधितांची संख्या 10 वर पोहोचली आहे. 10 रुग्णांपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून नऊ जण अजूनही एलएनजेपी रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी कोणत्याही रुग्णामध्ये गंभीर लक्षणं नसल्याचं दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं आहे.

गुजरातमध्ये आरोग्यसेविकाला लागण
गुजरातमधील मेहसाणा इथं एका महिला आरोग्य सेविकेला ओमायक्रॉनची लागण झाली. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील विजापूर तालुक्यातल्या एका गावात 41 वर्षीय महिला आरोग्य सेविकेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आलं. राज्यातील ओमिक्रॉन संसर्गाची ही पाचवी घटना आहे. या महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं गुजरातच्या आरोग्य विभागने म्हटलं आहे.

मुंबईत कडक नियम
मुंबईत 16 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात मोठ्या कार्यक्रमांसाठी निर्बंध असतील अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.