हिसार : एका वाहिनीवरून प्रसारीत होणारा 'लाईफ में कुछ भी हो सकता हैं' हा अनुपम खेर यांचा शो अनेकांनी पाहिला असेल. हा शो पाहून अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की, माझ्याच आयुष्यात ते कथीत 'कुछ भी' का होत नाही. पण, हिंम्मत हारू नका. एका व्यक्तीच्या आयुष्यात खरेच असे घडले आहे. या व्यक्तीला चक्क भंगारात सोनं मिळालं आहे.
गौरीशंकर उर्फ विक्की डबवाली असं या व्यक्तीचे नाव. विक्की हे त्याचं टोपण नाव. हरयाणातील सिरसा जिल्ह्यातील डबवाली गावात तो राहतो. मुळातच हा व्यक्ती अत्यंत गरीब. पोटासाठी एक दुकान चालवतो. फावल्या वेळात पडेल ते काम करतो. खिशात पैसा नसेल तर, दूनिया श्रीमंत दिसू लागते. याही व्यक्तीच्या बाबतीत असा प्रसंग आला. आर्थिक चणचण भासली म्हणून त्याने घरातील भंगार विकायचे ठरवले. गंमत अशी की, या भंगारानेच त्याचं आयुष्य बदलवलं. 'लाईफ में कुछ भी हो सकता हैं'मधलं ते कथीत 'कुछ भी' त्याच्याबाबतीत घडलं होतं.
गौरीशंकरला भंगारात एक नाणं सापडलं. हे नाण साधंसुधं नव्हतं. तर, चक्क इस्लामकाळातलं होतं. तेही तब्बल ५६७ वर्षे जुनं असलेलं. हे नाणं त्याला सापडलं आणि तो कोट्यधीश झाला. हे नाणं खरेदी करण्यासाठी दुबईतील एका व्यक्तीने चक्क दीड कोटी रूपये मोजायची तयारी दर्शवली. पण, इथे गौरीशंकरचा मोह आड आला. त्याला आता या नाण्यासाठी चक्क साडे तीन कोटी रूपये हवे आहेत. आता बोला...
दुकानातून होणाऱ्या मिळकतीत गौरीशंकरचं घर चालत नाही. त्यासाठी तो सिरसा रोडवर सीट तयार करण्याचं काम करतो. या कामातून त्याच्या फाटक्या संसाराला तेवढाच हातभार लागतो. दरम्यान, एका रविवारी त्याला पैशांची फारच नड होती. त्याने घरातील भंगार विकण्याचा निर्णय घेतला. या भंगारात त्याला एक जूनी संदूक सापडली. ज्यात त्याला हे नाणं सापडलं. अर्थातच हे नाणं प्रचंड घाण झालं होतं. पण, त्याने ते नाणं साफ केलं. साफ केलेल्या नाण्यावर त्याला उर्दूतली अक्षरे दिसली. हे नाणं ऐतिहासिक आहे हे ओळखायला इतका पुरावा पुरेसा होता. गौरीशंकरच्या चाणाक्ष बुद्धीनेही हे टीपले.
नाणे घेऊन तो गावातील इमामाकडे गेला. हा इमाम गावातील मशिदीचा कारभार पाहतो. इमाम उर्दूचा पक्का जाणकार. त्याने नाण्यांवरील अक्षरे वाचली. हे नाणं १४५० सालचं असल्याचे त्याने गौरीशंकरला सांगितले. इतकेच नव्हे तर, नाण्यावर मदिना शहर असा उल्लेख असल्याचेही त्याने सांगितले. मग गौरिशंकरने या नाण्याचा तपशील आणि फोटो आपल्या मित्राकरवी दुबईला पोहोचवले. काही काळातच त्याला प्रतिसाद आला. दुबईच्या एका व्यक्तीने हे नाणे दीड कोटी रूपयांना खरेदी करण्याची तयारी दाखवली. पण गौरिशंकरने याला नकार दिला. आता त्याला या नाण्याचे ३५० रूपये हवे आहेत.