ओम बिर्ला बनले लोकसभेचे नवे अध्यक्ष

ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष

Updated: Jun 19, 2019, 02:34 PM IST
ओम बिर्ला बनले लोकसभेचे नवे अध्यक्ष title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जेव्हा त्यांनी लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी राजस्थानच्या कोटा येथून खासदार असलेले ओम बिर्ला यांचं नाव पुढे केलं. आज ओम बिर्ला हे लोकसभेचे नवे अध्यक्ष बनले आहेत. लोकसभा अध्यक्ष कोण होणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण ओम बिर्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.ओम बिर्ला हे लोकसभेचे १७ वे अध्यक्ष बनले आहेत. याआधी सुमित्रा महाजन या लोकसभा अध्यक्षा होत्या.  

ओम बिर्ला यांना पंतप्रधान मोदींनी यावेळी त्यांना त्यांच्या जागेपर्यंत नेलं. ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड झाली. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षासाठी निवड होणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचं यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलं. 

लोकसभा अध्यक्ष पदासाठी अनेक वरिष्ठ खासदारांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार हे दिग्गज नेते होते. राजस्थानच्या कोटा येथून भाजप खासदार असलेले ओम बिर्ला हे आता लोकसभेचे नवे अध्यक्ष बनले आहेत. एनडीएकडे बहुमत असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात होती. लोकसभा निवडणुकीत कोटाच्या इतिहासात २ लाख ७९ हजार मतांनी त्यांनी सर्वात मोठा विजय मिळवला.

भारतीय जनता पक्षासह लोकसभा स्पीकरसाठी एनडीएमध्ये असलेले शिवसेना, जेडीयू, अकाली दल यांनी देखील ओम बिर्ला यांच्या नावाला सहमती दर्शवली. एनडीए शिवाय ओडिशातील बीजू जनता दलाने देखील त्यांना समर्थन दिलं. विरोधी पक्षाने कोणताच उमेदवार न देण्याचं ठरवल्य़ाने ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह एनडीएचे इतर नेते हे प्रस्तावक होते.

कोण आहेत ओम बिर्ला?

ओम बिर्ला हे राजस्थानच्या कोटीमधून खासदार आहेत. दुसऱ्यांदा ते खासदार झाले आहेत. राजस्थान सरकारमध्ये ते संसदीय सचिव होते. २०१४ मध्ये ते संसदेच्या अनेक समित्यांमध्ये सदस्य होते. मोठ्या नेत्यांसोबत देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. ऊर्जावान व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे.

ओम बिर्ला हे २०१४ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. २०१९ मध्ये त्यांनी कोटा येथून परत निवडणूक जिंकली. २००३, २००८ आणि २०१३ मध्ये ते कोटामधून आमदार होते. अशा प्रकारे ३ वेळा आमदार आणि २ वेळा खासदार ते होते.