Odisha Train Accident: 275 मृतांपैकी केवळ 104 जणांचीच ओळख पटली! बेवारस मृतदेहांचं काय होणार? सरकारने दिलं उत्तर

Odisha Train Accident Unclaimed Dead Bodies: ओ़डिशामधील हा भीषण अपघातामध्ये एकूण 275 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी केवळ 104 जणांची ओळख पटली आहे. अद्याप 171 जणांची ओळख पटलेली नसून त्यासंदर्भातील प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 5, 2023, 04:31 PM IST
Odisha Train Accident: 275 मृतांपैकी केवळ 104 जणांचीच ओळख पटली! बेवारस मृतदेहांचं काय होणार? सरकारने दिलं उत्तर title=
दोन्ही ट्रेनमध्ये एकूण 2500 प्रवासी होते

Odisha Train Accident Unclaimed Dead Bodies: ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात कोरामंडल एक्सप्रेसला (Coromandel Express) झालेल्या भीषण ट्रेन अपघातात (Odisha Train Accident) 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कोरामंडल एक्सप्रेसच्या अपघातग्रस्त डब्ब्यांना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसने (Bengaluru-Howrah Superfast Express) धडक दिल्याने मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर आज पहाटे जवळजवळ 51 तासांनी या मार्गावरील सेवा पूर्वव्रत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे. मात्र मरण पावलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांसंदर्भातील मोठी समस्या आता राज्य आणि रेल्वे प्रशासनासमोर उभी आहे. या दुर्घटनेमधील 151 मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. 

मृतदेह फार काळ ठेवता येणार नाही

ज्या मृतदेहांची ओळख पटली आहे ते मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यासंदर्भातील अगदी वाहतूक व्यवस्थेपासून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ओडिशा सरकारने यासाठी नि:शुल्क सेवा उपलब्ध करुन दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव पी. के. जेना यांनी ओळख न पटलेल्या बेवारस मृतदेहांबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. सर्व मृतांची ओळख पटावी यासाठी राज्य सरकार सर्व ते प्रयत्न करत आहे. सर्व मृतांची ओळख पटून त्यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांनीच अत्यंसंस्कार करावेत असा सरकारचा प्रयत्न आहे. "सध्या उष्णता अधिक असल्याने मृतदेह कुजत आहेत," असं जेना यांनी स्पष्ट केलं. त्यामुळेच हे मृतदेह फार काळ ठेवता येणार नाहीत असंही पुढे बोलताना त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा >> Electronic Interlocking मधील गडबडीमुळे 288 जणांनी गमावले प्राण! पण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?

काय करणार राज्य सरकार?

मृतदेहांची ओळख पटली नाही आणि कोणी त्यासंदर्भातील दावा केला नाही तर काय केलं जाणार यासंदर्भात जेना यांनी राज्य सरकार अशा परिस्थितीत काय करणार हे सांगितलं. "कायद्यानुसार राज्य सरकार अंत्यसंस्कार करण्यासाठी आणखी 2 दिवस वाट पाहू शकतं," असं जेना म्हणाले. म्हणजेच पुढील 2 ते 3 दिवसांमध्येच (अंदाजे 7 ते 8 जूनपर्यंत) बेवारस मृतदेहांवर कोणीही दावा सांगितला नाही तर ओडिशा सरकार यंत्रणांच्या मदतीने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार.

नक्की वाचा >> Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?

मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न

मृतदेहांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान सध्या राज्य सरकारसमोर आहे. "डीएनए चाचणीसंदर्भातील सर्व व्यवस्था केली जाईल. तसेच मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो सरकारी वेबसाईटवर अपलोड केले जातील," असंही जेना यांनी मृतदेहांची ओळख पटवण्यासंदर्भातील प्रयत्नांबद्दल बोलताना सांगितलं. अपघात झाला तेव्हा दोन्ही ट्रेनमध्ये मिळून 2500 प्रवासी होते. अपघातामध्ये दोन्ही ट्रेनचे एकूण 21 डब्बे रुळावरुन घसरले. रेल्वेने मोटरमनची चुकी किंवा तांत्रिक चूक या दोन्ही गोष्टींची शक्यता नाकारली असून आता 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' यंत्रणेत जाणीवपूर्वकपणे केलेली छेडछाड किंवा घातपाताच्या दृष्टीने तपास केला जाणार आहे.