मृतांचा आकडा आणखी वाढणार? 'त्या' दोन बोगींमध्ये सर्च ऑपरेशन सुरु

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या 288 झाली आहे. या अपघातात 1175 जण जखमीही झाले आहेत. त्यापैकी 382 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आकाश नेटके | Updated: Jun 4, 2023, 08:59 AM IST
मृतांचा आकडा आणखी वाढणार? 'त्या' दोन बोगींमध्ये सर्च ऑपरेशन सुरु title=

Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघाताला 36 पेक्षा तास उलटले आहेत. बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. मात्र बचावकार्य अद्याप पूर्ण झालेले नाही. याचा अर्थ अजूनही आणखी लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराने आता शेवटच्या दोन धोकादायक डब्यांमध्ये बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र, या डब्यांमध्ये कोणीही जिवंत राहिले नसावे, अशी भीती व्यक्त होत आहे.

ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन गाड्यांच्या अपघातात किमान 288 लोक ठार झालेत आणि 1,100 हून अधिक लोक जखमी झाले, असे अग्निशमन दलाचे महासंचालक सुधांशू सारंगी यांनी सांगितले. दोन पॅसेंजर ट्रेन बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (bengaluru howrah sf express) आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एक मालगाडी रुळावरून घसरल्याने हा अपघात झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे दोन डबे कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. अपघातानंतर परिस्थिती अशी होती की लोकांना कसे बाहेर काढायचे तेच समजत नव्हते. या ट्रेनचे डबे कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकले. या दोन जनरल कंपार्टमेंटमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला खूप संघर्ष करावा लागला. त्याचवेळी या दोन डब्यांचे बचावकार्य अद्याप पूर्ण झालेले नाही.

बचाव कार्यात सामील असलेल्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, "हे दोन डबे उघडणे अत्यंत कठीण आहे. त्यात डझनभर मृतदेह असण्याची शक्यता आहे. आमचे काही जवान कसेतरी बोगी कापून आत घुसले आहेत. पण त्यात कोणाचाही जीव वाचण्याची शक्यता नाही. जोपर्यंत दोन्ही डबे क्रेनने उचलले जात नाहीत तोपर्यंत सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, हे सांगणे कठीण आहे. क्रेन त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही कारण डबे उलटू शकतात आणि क्रेनवरच पडू शकतात. सध्या बोगी कापून आत जाण्याचा एकमेव मार्ग आहे. पण त्यासाठी थोडा वेळ लागेल."

कसा झाला अपघात?

संध्याकाळी 7 वाजता झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. ट्रेन क्रमांक 12481 कोरोमंडल एक्सप्रेस बहंगा बाजार स्टेशनच्या (शालिमार-मद्रास) मुख्य मार्गावरून जात होती, त्याचवेळी अप लूप मार्गावरील मालगाडीला धडकली. ट्रेन फुल स्पीडमध्ये असल्याने स्टेशनवर थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे 21 डबे रुळावरून घसरले तर 3 डबे डाऊन मार्गावर गेले. त्याचवेळी डाउन मार्गावरील 12864 यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहंगा बाजार स्थानकावरून जात असताना कोरोमंडलच्या डब्यांना धडकली. यानंतर हावडा एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये 1257 लोकांनी आरक्षण केले होते तर हावडा यशवंतपूर एक्स्प्रेसमध्ये 1039 लोकांनी आरक्षण केले होते.

अपघाताच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकापूर्वी मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनवर गेली होती, जिथे ती आधीच थांबलेल्या मालगाडीला धडकली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपास अहवालानुसार कोरोमंडल एक्स्प्रेससाठी अप मेनलाइन सिग्नल देण्यात आला होता आणि त्यानंतर तो मागे घेण्यात आला. यामुळे गाडी लूप लाइनमध्ये घुसली. मालगाडीला धडकल्यानंतर त्याचे काही डबे रुळावरून घसरले. दरम्यान, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाऊन मेन लाइनवरून जात असताना रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्याला धडकल्याने तिचे दोन डबे उलटले.