Odisha IT Raids 220 Crore: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या 10 जागांवर छापेमारी करण्यात आली. झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आयकर विभागाने केलेल्या या छापेमारीमध्ये नोटांनी भरलेली कापटं सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने 220 कोटी रुपये जप्त केले आहेत. नोटांची मोजणी अद्याप सुरु असून हा आकडा 250 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारपासून या नोटांची मोजणी सुरु आहे. नोटा मोजण्याच्या मशीन बंद पडल्याने नव्या मशीन मागवाव्या लागल्या. अशातच आता या छापेमारीदरम्यानचे फोटो समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
मद्य निर्मिती करणाऱ्या 'बलदेव साहू अॅण्ड ग्रुप ऑफ कंपनीज'च्या ओडिशामधील बोलांगीर कार्यालयापासून 30 किलोमीटरवर असलेल्या सातपुडा येथील कार्यालयामधून 200 कोटींहून अधिक कॅश जप्त करण्यात आली. 500, 200, 100 रुपयांच्या नोटांनी भरलेली तब्बल 9 कपाटं या कार्यालयामध्ये सापडली. झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील ही आयकर विभागाची सर्वात मोठी छापेमारी ठरली आहे. बलदेव साहू ही झारखंडमध्ये देशी मद्याची निर्मिती करणारी सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आयकर विभागाच्या 40 सदस्य असलेल्या टीमने बुधवारी पहाटे 6 वाजून 30 मिनिटांनी ओडिशामधील बौध, बोलांगीर, रायगड आणि संबळपूरबरोबरच झारखंडमधील रांची-लोहरदगा आणि बंगालमधील कोलकात्यामधील कार्यालयांवर एकाच वेळी छापेमारी केली.
'बलदेव साहू अॅण्ड ग्रुप ऑफ कंपनीज'मध्ये राज्यसभा खासदार धीरस साहू यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील राजकिशोर साहू, स्वराज साहू आणि कुटुंबातील इतर सदस्यांची हिस्सेदारी आहे. ओदिशामधील कारभार दीपक साहू आणि संजय साहू संभाळतात. छापेमारीदरम्यान रांची आणि लोहरदगा निवासस्थानी घरातील एकही सदस्य अधिकाऱ्यांना आढळून आले नाहीत.
'बलदेव साहू अॅण्ड ग्रुप ऑफ कंपनीज'मधील छापेमारीच्या बातम्या 8 तारखेला छापून आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी यावर एक्सवरुन (ट्विटरवरुन) प्रतिक्रिया नोंदलवी आहे. "देशातील नागरिकांनो या नोटांचे ढीग पाहा आणि नंतर यांच्या नेत्यांची ईमानदारीबद्दलची 'भाषण' ऐका," असा सल्ला मोदींनी या बातमीचं कात्रण शेअर करत दिला आहे. विशेष म्हणजे मोदींनी या पोस्टमध्ये हसण्याचे इमोजीही वापरलेत. पोस्टमध्ये पुढे पंतप्रधान मोदींनी, "जनतेकडून जे लुटलं आहे त्यामधील पै अन् पै द्यावी लागेल ही मोदींची गॅरंटी आहे," असंही म्हटलं आहे.
देशवासी इन नोटों के ढेर को देखें और फिर इनके नेताओं के ईमानदारी के 'भाषणों' को सुनें...
जनता से जो लूटा है, उसकी पाई-पाई लौटानी पड़ेगी, यह मोदी की गारंटी है।
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2023
आयकर विभागाने नोटा बोलांगीर येथील स्टेट बँकेत ठेवल्या आहेत. हे पैसे भरुन नेण्यासाठी मोठ्या आकाराच्या तब्बल 157 बॅगांची गरज पडली. बॅगा कमी पडल्याने पोत्यांमध्ये भरुन ट्रकने ही रक्कम एसबीआयच्या शाखेत नेण्यात आली.