मटण, मासे, भाज्यांच्या कचऱ्यापासून धावणार तुमची गाडी

जाणून घ्या हे कसे शक्य होणार...

Updated: Sep 24, 2019, 09:29 AM IST
मटण, मासे, भाज्यांच्या कचऱ्यापासून धावणार तुमची गाडी title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : मटन, मच्छी, भाज्या आपण खातो. पण आता या सगळ्याचा उपयोग गाडी चालवण्यासाठीही होणार आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी, पुढील दोन महिन्यात हे शक्य असल्याचे सांगितले आहे. नागपूरमध्ये या प्रकल्पावर काम सुरु आहे. 

बायोडायजेस्टरद्वारे मटण, मासे, फळे, भाजीपाला यांच्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते, असे गडकरी म्हणाले. या प्रक्रियेद्वारे मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड वेगळे करुन बायो सीएनजी (CNG) बनवले जाऊ शकते.

अशाप्रकारे बनवण्यात येणाऱ्या सीएनजीपासून २०० बस चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. 

टाकाऊ ओल्या कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी, गडकरी यांनी ओल्या कचऱ्यापासून बायो सीएनजी बनवण्याची योजना सांगितली. 

सध्या महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीने लुधियानामध्ये एक प्रकल्प सुरु केला आहे. तिथे ओल्या कचऱ्यापासून बायो सीएनजी बनवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ५ टन टाकाऊ ओल्या कचऱ्यापासून १ टन बायो सीएनजी बनवण्यात येऊ शकत असल्याचे गडकरींनी सांगितले.

असे अनेक प्रकल्प सुरू व्हावेत, असा सरकारचा मानस आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. लघु व मध्यम उद्योग मंत्रालय अशाप्रकारच्या प्रकल्पांसाठी अर्थसाहाय्य करण्यास तयार आहे. 

सरकार लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) आयात करते. जवळपास ९१ मिलियन मॅट्रिक स्टॅंडर्ड क्यूबिक मीटर दररोज आयात करण्यात येते.

या लिक्विफाइड नॅचरल गॅसला (LNG) गॅसीफाय केल्यानंतर, गाड्यांसाठी सीएनजी आणि घरांसाठी पीएनजी (PNG) बनवण्यात येते. 

जैवइंधनाद्वारे देशाला फायदा होईल. शिवाय टाकाऊ ओला कचरा जाळण्याच्या घटनांमध्येही कमी येईल, असे सरकारचे म्हणणे आहे. तसेच मच्छी-मटन मार्केट, फळ-भाज्या बाजारातून निघणाऱ्या कचऱ्याचे ढीग जमा न होता, त्यापासून इंधन बनवले जाऊन त्याचा वापर केला जाऊ शकतो.