कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि आसपासच्या परिसरांत सोमवारी 'नॉर्वेस्टर' वादळ धडकले. या वादळाने अनेक भागात मुसळधार पावसासह अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक भागातील विजेच्या तारा तुटल्या असल्याचीही माहिती मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ३ वाजून ५५ मिनिटांनी कोलकाता आणि आसपासच्या भागात ताशी ४४ किलोमीटर वेगाने वादळ आले. त्यानंतर सकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी ताशी ५६ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले.
दरम्यान, शहरात १५.६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने १६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. जोरदार वादळ आणि मुसळधार पावसाने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कोलकातातील आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलिसांकडून रस्त्यावरील कोसळलेली झाडे उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरांत १४ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. कोसळलेली झाडे उचलण्यात येत असून रस्ते वाहतूक पूर्वस्थितीत करण्यात येत आहे. दक्षिण बंगालमधील दुसऱ्या भागातही नॉर्वेस्टर वादळ आल्याने काही भागातील झोपडपट्टी आणि विजेच्या खांबांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे.