नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असताना आता आणखी एका आजाराने धडकी भरवली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यानं चिंता वाढली आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट सोबत लढताना नाकीनव आली असतानाच आता Norovirus नावाच्या एका आजारानं थैमान घातलं आहे. हा आजार नेमका काय आहे? याची लक्षणं काय आहेत याबाबत आता माहिती समोर आली आहे.
एकीकडे डेल्टा व्हेरिएंट गंभीर रूप घेत असताना दुसरीकडे यूनाइटेड किंगडममध्ये Norovirus नावाचा आजार फोफावत चालला आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडने दिलेल्या माहितीनुसार 26 जुलैपर्यंत या आजारचा संसर्ग झालेले एकूण 154 रुग्ण सापडले आहेत. या व्हायरसचा संसर्ग तिथे वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
Norovirus चा संसर्ग झालेल्या व्यक्तीला अतिसार आणि उल्ट्यांचा त्रास होतो. याला काहीजण 'विंटर वॉमिटिंग बग' असंही म्हणतात. CDC म्हणजेच सेंटर फॉर डिसिज कंट्रोल एड प्रिव्हेंशन यांच्या म्हणण्यानुसार याचा संसर्ग कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. याला काही तज्ज्ञ स्टमक फ्लू बग असंही म्हणतात.
या व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना अतिसार, उलट्या, अस्वस्थ वाटणं, पोटात अति तीव्र दुखापत होणं अशी लक्षणं दिसून आली आहेत. याशिवाय दुसऱ्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि शरीर दुखणं हे प्रकारही काही रुग्णांमध्ये आढळून आले आहेत.
हा संसर्ग कोरोना इतकाच धोकादायक आहे. रुग्णाच्या थुंकीचे काही थेंबही हा संसर्ग फोफावण्यासाठी निमित्त ठरू शकतात. या व्हायरसचे काही पार्टीकल्स अगदी सहजपणे अनेक लोकांपर्यंत हा संसर्ग पसरवू शकतात. हा व्हायरस नेमका आला कसा याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र कोरोना इतकाच भयंकर असल्याचं सांगितलं जात आहे.
या व्हायरसचा संसर्ग झालेली व्यकी जर दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आली किंवा त्याचे कपडे, अन्न किंवा इतर गोष्टी वापरल्या तरीही याचा संसर्ग होऊ शकतो. इतकच नाही तर पाण्यातूनही हा संसर्ग पसण्याचा धोका आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ज्या उपाययोजना करतो त्याच उपाययोजना आणि खबरदारी या आजारामध्ये घेणं गरजेचं आहे.
सध्यातरी या आजारावर कोणतंही ठोस औषध उपलब्ध नाही. भारतात याचा सध्यातरी कोणता रुग्ण आढळल्याचं समोर आलं नाही. मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ज्या गोष्टी करतो त्याच करणं आपल्या हातात आहे. सॅनिटाइझरचा वापर करा. मास्क वापरा. कोणत्याही गोष्टीला हात लावला तर स्वच्छ हात धुवा आणि मगच खा आणि प्या.