पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर सरकारमध्ये असताना झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कोणतीची भूमिका घेण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असमर्थ ठरले होते. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आम्ही या आघाडीतून बाहेर पडलो, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. नितीशकुमार यांनी त्यावेळी अचानक राजीनामा देण्याच्या निर्णयामागे काय परिस्थिती होती, याचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
बिहारमध्ये २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागांवर निवडणूक लढविण्यास संयुक्त जनता दलानेच महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर राहुल गांधी यांनी त्यावेळी ब्र सुद्धा काढला नाही. आघाडीमध्ये असूनही काँग्रेस पक्षाने या प्रकरणी त्यांचे म्हणणे मांडणारे निवेदनही प्रसिद्ध केले नाही. तसे केले असते तरी आम्ही त्यावेळी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पूनर्विचार केला असता, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी त्यावेळी घेतलेल्या भूमिकेमुळे माझ्यावरच लाजिरवाणी होण्याची वेळ आली, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय जनता दल, काँग्रेसशी असलेली आघाडी नितीशकुमार यांनी जुलै २०१७ तोडली होती. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील तणाव वाढतच गेला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि जातीयवाद याला कधीच थारा न देण्याची आमच्या पक्षाची भूमिका आहे. पण राष्ट्रीय जनता दलाची काम करण्याची पद्धत एकदम वेगळी असल्यामुळे मला बिहारमध्ये काम करणे अवघड होऊन बसले होते. प्रत्येक स्तरावर त्यांच्याकडून कामात हस्तक्षेप होत होता. त्यांच्याच लोकांनी केलेल्या गुन्ह्यांची माहिती त्यांचे लोक पोलिसांना देत होते, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.