नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्ली-मुंबई ग्रीन एक्स्प्रेस (delhi-mumbai expressway) वेच्या कामाची पाहणी केली. नितीन गडकरी (Niting Gadkari) यांनी सकाळी हरियाणामध्ये पाहणी केल्यानंतर राजस्थानमध्ये महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर 12 तासात पूर्ण करता येणार आहे. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून महामार्ग जाईल.
यानिमित्ताने हरियाणाच्या सोहनामध्ये झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी संबोधित केलं. आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी एक गौप्यस्फोट केला. स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांनी यावेळी आयुष्यातील एक किस्सा सांगितला.
'माझं नुकतंच लग्न झालं होतं, तेव्हा रामटेकमध्ये रस्ते बांधकाम सुरु होतं, आणि माझ्या सासऱ्यांचं घर रस्त्याच्या मधोमध येत होतं. यावेळी पत्नीला कोणतीही कल्पना न देता सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, तो रस्ता पूर्ण केला', असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी यावेळी केला.
यावेळी त्यांनी केंद्रातील सहकारी राव इंद्रजीत सिंग यांचे आभार मानले. इंद्रजीत सिंग यांनीही एक्स्प्रेस वेमध्ये येत असलेल्या आपल्या सासरचं घर खाली करण्यास सांगितलं, ही भूमिका घेतल्याबद्दल नितीन गडकरी यांनी इंद्रजीत सिंग यांचे धन्यवाद मानले. नेत्याने अतिक्रमण वाचवण्याचं पाप करु नये, असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
मी प्रत्येक कामात निरिक्षण करतो, या रस्त्याची पाहणी करताना काम चांगल्या पद्धतीने झाल्याचं आपण इथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं. रस्त्याची गुणवत्ता चांगली असावी यासाठी आमचा नेहमीच आग्रह राहिलाय. कारण आम्ही कंत्राटदाराकडून पैसे घेतले नाहीत, आणि गुणवत्ता चांगली नसेल तर कंत्राटदाराला ठोकण्यासही आम्ही कमी करणार नाही, असं नितीन गडकरी यांनी ठणकावलं.
देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा हा महामार्ग 1 लाख कोटी रुपये खर्च करुन पूर्ण केला जात आहे. या महामार्गाचं काम 2023 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. या महामार्गाचं काम तीन राज्यात प्रत्यक्ष सुरु झालं आहे. 1380 कि.मीचा हा महामार्ग देशातील सर्वात लांबीचा महामार्ग असेल. या महामार्गामुळं दिल्ली ते मुंबई अंतर 130 किलोमीटरनं कमी होईल. दिल्ली, फरिदाबाद, सोहना, जयपूर शहरांना जोडलं जाईल.