निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी कायम

निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी विनय, पवन, आणि मुकेश यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. 

Updated: Jul 9, 2018, 04:13 PM IST
निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी कायम title=

नवी दिल्ली: माणुसकीला  काळीमा फासणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातल्या तिन्ही आरोपींची फाशी कायम ठेवण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही आरोपींनी केलेली पुनर्विचार  याचिका फेटाळून लावलीय. १३ सप्टेंबर २०१३ ला मुकेश सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह या चौघांना साकेत न्यायालयानं दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली होती. चौथा आरोपी अक्षयनं पुनर्विचार याचिका दाखल केलीच नव्हती.  निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी विनय, पवन, आणि मुकेश यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.  कुटुंबाची आर्थिक स्थिती बघता फाशीची शिक्षा कमी करावी,अशी तिघांची याचिका होती. पण आज सर्वोच्च न्यायालायानं ही याचिका फेटाळून लावली.

चारही आरोपींना फाशीची शिक्षा
दरम्यान, १३ मार्च २०१४ ला दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर ५ मे २०१७ ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर. भानुमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठानंही चौघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. १६ डिसेंबर २०१२ रोजी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या २३ वर्षीय निर्भयावर धावत्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलासह सहाजणांनी निर्दयी बलात्कार केला. त्यानंतर अत्यंत निर्घृणपणे तिची शारिरीक विटंबनाही केली होती. हा आघात एवढा जबरदस्त होता की, १३ दिवसांनी सिंगापूरच्या रूग्णालयात निर्भयाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

एकूण सहा आरोपींना अटक 
निर्भया प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एकानं ११ मार्च १०१३ मध्ये तिहार तुरूंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर एका अल्पवयीन आरोपीला तीन वर्षं सुधारगृहात ठेवण्याचा आदेश ३ सप्टेंबर २०१३ ला बालगुन्हेगारी न्यायालयानं दिला होता.