फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

सर्व दोषींच्या १३ कुटंबीयांनी मिळून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे.

Updated: Mar 16, 2020, 05:13 PM IST
फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव title=

नवी दिल्ली: निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Case) दोषींनी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी नवा डाव खेळला आहे. या प्रकरणातील अक्षयकुमार सिंह, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या तीन दोषींनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली आहे. दोषींच्या वकिलांकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र लिहण्यात आले आहे. यामध्ये २० मार्चला दोषींना देण्यात येणाऱ्या फाशीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील सर्व दोषींच्या क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्या होत्या. त्यामुळे या दोषींची फाशी निश्चित मानली जात आहे. परिणामी आता या दोषी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. 

'निर्भया' प्रकरणातील दोषी म्हणतात '...तर फाशीची गरज काय?'

सर्व दोषींच्या १३ कुटंबीयांनी मिळून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे. यामध्ये मुकेश सिंह याच्या कुटुंबातील दोन सदस्य, पवन आणि विनय यांच्या घरातील प्रत्येक चार सदस्य आणि अक्षयकुमार सिंह याच्या कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.  

दिल्ली बलात्कार प्रकरण : निर्भयाची हत्या केली नसती पण...

मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघांना २० मार्चला सकाळी ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. दिल्ली न्यायालयाकडून यासाठी डेथ वॉरंट जाहीर करण्यात आले होते. यानंतर जल्लादाला तिहार तुरुंगात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे या चौघांची फाशी निश्चित मानला जात होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यास कायदेशीर पेच उभा राहण्याची शक्यता आहे.