New Labour Code: कर्मचाऱ्यांसाठी सर्वांत मोठी बातमी,1 जुलैपासून लागू होणार 'हे' नवीन नियम

सर्वसामान्य कर्मचारी वर्गासाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे.

Updated: Jun 25, 2022, 01:35 PM IST
New Labour Code: कर्मचाऱ्यांसाठी सर्वांत मोठी बातमी,1 जुलैपासून लागू होणार 'हे' नवीन नियम title=

मुंबई : सर्वसामान्य कर्मचारी वर्गासाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने नवीन वेतन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 1 जूलैपासून  हा कायदा लागू होणार आहे. या नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगार आणि सुटट्यांमध्ये मोठे बदल होणार आहे. हे नवीन बदल काय असणार आहेत, ते जाणून घेऊयात.  

वार्षिक सुट्यांमध्ये मोठी वाढ

कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सुटट्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. याआधी कर्मचाऱ्यांना वार्षिक सुट्ट्या 240 मिळायच्या,मात्र आता त्या 300 मिळणार असल्याची मागणी करण्यात आलीय. म्हणजेच दरवर्षी अतिरिक्त 60 सुट्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी आहे.  

टेक होम सॅलरीत बदल 
नवीन वेतन कायद्यानुसार कर्मचार्‍यांच्या पगार रचनेत बदल केला जाईल, टेक होम पगारात कपात केली जाईल. वेतन संहिता कायदा, 2019 नुसार, कर्मचाऱ्याचा मूळ पगार कंपनीच्या (CTC) खर्चाच्या 50% पेक्षा कमी असू शकत नाही. सध्या अनेक कंपन्या मूळ पगार कमी करतात आणि वरून जास्त भत्ते देतात त्यामुळे कंपनीवरचा बोजा कमी होतो.

कर्मचारी भत्ते
एका कर्मचाऱ्याच्या कॉस्ट-टू-कंपनीमध्ये (CTC) तीन ते चार घटक असतात. मूळ वेतन, घरभाडे भत्ता (HRA), पीएफ, ग्रॅच्युइटी आणि पेन्शन सारखे सेवानिवृत्तीचे फायदे आणि एलटीए आणि करमणूक भत्ता सारखे कर बचत भत्ते. आता नवीन वेतन संहितेमध्ये असे ठरवण्यात आले आहे की भत्ते कोणत्याही किंमतीत एकूण पगाराच्या 50% पेक्षा जास्त असू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 50 हजार रुपये महिना असेल तर त्याचा मूळ पगार 25 हजार रुपये आणि त्याचे भत्ते उर्वरित 25 हजार रुपयांमध्ये यायला हवेत.

एकूणच आतापर्यंत ज्या कंपन्या मूळ वेतन 25-30 टक्के ठेवत असत आणि उर्वरित भाग भत्त्याचा होता, त्यांना आता मूळ वेतन 50 टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाही. अशा परिस्थितीत नवीन वेतन संहितेचे नियम लागू करण्यासाठी कंपन्यांना अनेक भत्तेही कमी करावे लागतील.

साप्ताहिक सुट्टीत वाढ
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमात आठवड्यातील 48 तासांचा नियम लागू होणार आहे, प्रत्यक्षात काही संघटनांनी 12 तास काम आणि 3 दिवसांच्या सुट्टीच्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर सरकारने स्पष्टीकरण देताना सांगितले की, आठवड्यात 48 तास काम करण्याचा नियम असेल, जर कोणी दिवसातून 8 तास काम केले तर त्याला आठवड्यातून 6 दिवस काम करावे लागेल आणि एक दिवस सुट्टी मिळेल.

जर एखाद्या कंपनीने दिवसातील 12 तास काम स्वीकारले तर उर्वरित 3 दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी लागेल. जर कामाचे तास वाढले तर कामाचे दिवस देखील 6 ऐवजी 5 किंवा 4 होतील. मात्र यासाठी कर्मचारी आणि कंपनी या दोघांमध्येही करार असणे आवश्यक आहे.

दरम्यान नवीन वेतन कायद्यातील अनेक निर्णय हे कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे आहेत.