नेपाळमधील एक तरुणी गोव्यात बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही तरुणी नेपाळच्या धनगढी उप-महानगर शहराचे महापौर गोपाल हमाल यांची मुलगी आहे. आरती गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्यात असून, ओशो मेडिटेशन सेंटरसह काम करत होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती बेपत्ता झाली होती. सोमवारी रात्री 9.30 वाजता अश्वेम ब्रीजजवळ तिला अखेरचं पाहण्यात आलं होतं. पण अखेर पोलिसांना तिचा शोध लावण्यात यश आलं आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती हमाल उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापडल्याची माहिती दिली आहे.
ओशोंच्या मेडिटेशन सेंटरमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या आरती हमालशी कोणताही संपर्क होत नव्हता. यानंतर तिच्या वडिलांनी काठमांडूतील भारतीत दुतावासाच्या मदतीने गोवा पोलिसांशी संपर्क साधला होता. गोवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. तसंच गोपाल हमाल यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित आपल्या मुलीला शोधून काढण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी गोवा सरकार आणि पोलिसांकडे मुलीला शोधण्यासाठी विनंती केली होती.
गोपाल हमाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरतीच्या मैत्रिणीने आपला तिच्याशी संपर्क होत नसल्याचा मेसेज पाठवला होता. जेव्हा कुटुंबाने तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही यश आलं नाही आणि पोलिसांना अलर्ट करण्यात आलं.
"माझी मोठी मुलगी आरती ही ओशो मेडिटेटर असून गेल्या काही महिन्यांपासून गोव्यात राहत आहे. ला तिच्या मैत्रिणीकडून एक मेसेज आला की काल तिचा जोरबा बीच, अश्वेमजवळ आरतीशी संपर्क तुटला. मी गोव्यात राहणाऱ्यांना विनंती करतो की माझ्या मुलीच्या, आरतीच्या शोधात मदत करावी," असं आवाहन त्यांनी केलं होतं. आपली छोटी मुलगी आणि जावई तिच्या शोधात गोव्यात पोहोचल्याची माहितीही त्यांनी दिली होती.
"काही लोकांची खूप मदत झाली आहे आणि आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. काही कॉलर्सच्या म्हणण्यानुसार ती शेवटची सिओलिम जवळील एका पुलावर पाहिली गेली होती. त्यांच्यापैकी काही जणांचं म्हणणं आहे की, बेशुद्ध झाल्याने तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं होते. तर इतर सांगत आहेत की तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले,” अशी माहिती आरतीची बहिण आरजूने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान दुतावासाने मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अखेर आरती हमालला शोधून काढलं आहे.