नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर आपल्या आयुष्यात अनेक बदल होण्याच्या मार्गावर आहेत. आपला प्रवासादरम्यानही मोठे बदल होऊ शकतात. कोरोना व्हायरसच्या काळात अशा काही गोष्टी कराव्या लागणार आहेत ज्या यापूर्वी आवश्यक नव्हत्या. आता विमान प्रवासादरम्यान काही बदलांसह प्रवास करावा लागू शकतो.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्व विमान सेवा बंद आहेत. कोरोना संसर्गाचा धोका पाहता सर्व प्रमुख एयरपोर्ट्स आणि विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसह प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण आहे. कारण लॉकडाऊन संपल्यानंतरही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला असं म्हणता येणार नाही.अशातच आता दिल्ली इंटरनॅशनल एयरपोर्ट लिमिटेडने (DIAL) सिविल एविएशन मिनिस्ट्री अर्थात नागरी उड्डाण मंत्रालयाला, विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना कोरोना व्हायरसमुक्त झाल्याचं प्रमाणपत्र असणं अनिर्वाय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विमानतळ आणि विमानात कोरोना संसर्गाचा धोका कमी केला जाऊ शकतो.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन नंतरही विमानतळ आणि विमानातून प्रवास करतानाही मास्क लावणं अनिर्वाय करण्यावर विचार केला जात आहे. मास्क न लावलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी न देण्याबाबत चर्चा सुरु आहे.
दरम्यान, नागरी उड्डाण मंत्रालयाकडून, विमान प्रवास सुरु करण्याच्या 10 दिवस आधी सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना नव्या नियमांबाबत सूचित केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.