श्रीनगर: काश्मीर खोऱ्यात जवळपास ३०० अतिरेक्यांच्या सक्रीय हालचाली सुरु आहेत. यापैकी २५० दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करी सूत्रांकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी लष्कराकडून कोणतीही कसर सोडली जाणार नाही. लष्कर, पोलीस, सीआरपीएफसह सर्व दलांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दहशतवाद्यांना खोऱ्यात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सोमवारपासून चार टप्प्यांत स्थानिक निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार न पाडण्यासाठी पाकिस्तानकडून काही आगळीक केली जाण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत, निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सुरक्षेचे उपाय म्हणून गाड्यांच्या तपासणीसह संशयित व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच चौक्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.