राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणांचं नाव आघाडीवर

महाराष्ट्राला मिळणार राज्यसभेचं उपसभापती पद ?

Updated: Aug 7, 2018, 01:24 PM IST
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणांचं नाव आघाडीवर title=

मुंबई : राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला राज्यसभेचं उपसभापतीपद मिळतं का हे पाहावं लागणार आहे. संख्याबळाचा विचार केला तर ही गोष्ट इतकी सोपी देखील नाही आहे. राष्ट्रवादीसह विरोधकांना यासाठी इतर विरोधकांचं देखील संख्याबळ मिळवावं लागणार आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी 9 ऑगस्टला निवडणुका होणार आहेत. सभापती एम वेंकैया नायडू यांनी राज्यसभेत याची घोषणा केली. यासाछी बुधवारी 8 ऑगस्टला 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता यासाठी मतदान होणार आहे. मागचे उपसभापती पी. जे कुरियन यांचा कार्यकाळ मागच्या महिन्यातच संपला आहे. राज्यसभेत 245 सदस्य आहेत. राज्यसभेत उपसभापतीची निवडणूक जिंकण्यासाठी 122 जणांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे.

दुसरीकडे राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जेडीयूचे नेते हरिवंश यांना एनडीएची उमेदवारी मिळणार आहे. राज्यसभेच्या उपसभापतीची निवड बिनविरोध व्हावी अशी इच्छा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व्यैकंय्या नायडू यांनी व्यक्त केली. पण एकमत झालं नाही. दरम्यान एनडीएनं दिलेल्या उमेदवाराविरोधात उमेदवार उभा करण्याच्या विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे.

राज्यसभेतले विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत १० पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यात राजद, बसापा, तृणमूल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, द्रमुक आणि तेलगू देसमचे राज्यसभा खासदार सामील झाले. राज्यसभेचं उपसभापती विरोधीपक्षांकडे असावं असं सर्वांचं मत असल्याचं आझाद यांनी बैठकीनंतर सांगितलं आहे. दरम्यान राज्यसभेतलं पक्षीय बलाबल बघता, एनडीएचा उमेदवार निवडून आणायचा असेल, तर सरकारला बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती ,वायएसआर काँग्रेस आणि पीडीपी पक्षांच्या एकूण १९ खासदारांचं समर्थन मिळावं लागणार आहे. आज दिवसभर यासंदर्भात राजकीय घड़ामोडींना वेग येणार आहे.