नवी दिल्ली : महाविकास आघाडीतील तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. बहुमत चाचणीच्या वेळी मतदान करु द्यावं, अशी याचिका मलिक आणि देशमुखांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. बहुमत चाचणीच्या राज्यपालांच्या आदेशाला शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्याचवेळी मलिक आणि देशमुखांच्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे.
राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्वाचा ठरणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. विधिमंडळ सचिवांकडूनही विशेष अधिवेशनाची अधिसूचना काढण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे एक एक आमदाराचे मत महाविकास आघाडीसाठी महत्वाचे आहे.
न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याच्या बाजूने कौल दिल्यास आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मताचीही महाविकास आघाडीला गरज आहे. हे दोन्ही आमदार सध्या वेगवेगळ्या गुन्ह्याखाली तुरूंगात आहेत. त्यामुळे दोन्ही आमदारांनी मतदानासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.