National Flag Day 2024: भाराचा राष्ट्रध्वज..... तिरंगा.... उल्लेख जरी केला तरी वाऱ्याच्या झोतासमवेत डौलानं उभा असणारा सुरेख ध्वज डोळ्यांसमोर येतो. 22 जुलै 1947 या दिवशी भारताच्या संविधान सभेनं तिरंग्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार केला होता. हा एक ऐतिहासिक दिवस असून, त्याची स्वर्णाक्षरात नोंद आहे असं सांगितलं जातं.
सरकारी कागदपत्रांमध्ये असणाऱ्या उल्लेखानुसार 9 डिसेंबर 1946 पासून सुरू असणाऱ्या भारतीय संविधान सभेची बैठक 22 जुलै 1947 रोजी दिल्लीतील संविधान भवनामध्ये पार पडली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली होती. ही तीच संविधानसभा होती, जिथं देशाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात होती. त्या दिवशी सर्वात पहिला प्रस्ताव पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारा मांडला गेला असून, त्याच म्हटलं होतं, 'इथं असं प्रस्तावित केलं जातं की, भारताचा राष्ट्रीय ध्वज गडद केसरी, पांढरा आणि गडद हिरव्या रंगाचा तिरंगा असेल. तिन्ही रंग एकसमान प्रमाणात असून, मध्ये असणाऱ्या पांढऱ्या पट्टीच्या मधोमध चरख्याचं प्रतिनिधीत्वं करण्यासाठी निळ्या रंगाचं अशोकचक्र असेल. चक्राची आखणी सारनाख येथील अशोक स्तंभाच्या आकारावर आधारलेली असेल.'
संविधानसभेमध्ये मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार तिरंगा साकारला गेला. पण, तुम्हाला माहितीये ना, राष्ट्रध्वजामध्येही काही बदल करण्यात आले.
देशाचा पहिला राष्ट्रध्वज 7 ऑगस्ट 1906 मध्ये कोलकाता येथील पारसी बागान चौक ग्रीन पार्कमध्ये फडकवण्यात आला होता. या ध्वजाच्या मधोमध वन्देमातरम् लिहिण्यात आलं होतं, तर खालच्या बाजूला दोन्ही कोपऱ्यांमध्ये चंद्र आणि सूर्य दिसत होते.
1907 मध्ये ध्वजावर वंदेमातरम् लिहिण्याची पद्धत बदलली आणि चंद्र- सूर्याचं स्थानही बदललं. त्यामागोमाग 1917 मध्ये तिसऱ्यांदा बदल झालेला ध्वज लोकमान्य टिळक आणि डॉ. अॅनी बेझंट यांनी फडकवला होता. तर, 1921 मध्ये भारताचा चौथा ध्वज विजयवाडा येथे भारतीय काँग्रेसच्या एका अधिवेशनादरम्यान एका तरुणानं महात्मा गांधी यांना दिला होता. या ध्वजामध्ये लाल आणि पांढरा अशी रंगसंगती होती.
1931 मध्ये भारताचा जो राष्ट्रध्वज तयार करण्यात आला, तो सध्याच्या तिरंग्याशी मिळताजुळता होता. या ध्वजाच्या मध्यभागी अशोकचक्राऐवजी चरखा होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रध्वजातून चरखा हटवून तिथं अशोकचक्र स्थापिक करण्यात आलं आणि तेव्हापासून भारताचा राष्ट्रध्वज बदलला नाही.