PM Narendra Modi Security: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक? काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ सोडले काळे फुगे

पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Updated: Jul 4, 2022, 06:58 PM IST
PM Narendra Modi Security: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक? काँग्रेस कार्यकर्त्यांनी  मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ सोडले काळे फुगे title=

Narendra Modi Security: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आंध्रप्रदेश दौऱ्यादरम्यान (Andhra Pradesh) त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरच्या दिशेने काळे फुगे उडवून निषेध केला. पीएम मोदींचे हेलिकॉप्टर गन्नावरम विमानतळावरून उड्डाण घेत असताना तेथून काही अंतरावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हवेत काळे फुगे उडवले जे पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरजवळ आले.

पोलिसांनी मात्र पीएम मोदींच्या पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नसल्याचं म्हटलं आहे. फुगे विमानतळापासून 5 किलोमीटर अंतरावर उडवण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटकही केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेलिकॉप्टरच्या दिशेने उडवले फुगे
पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर 5 मिनिटांनी काळे फुगे हवेत सोडण्यात आले. पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वीच काँग्रेसने आंदोलनाची घोषणा केली होती आणि त्यामुळे कृष्णा जिल्ह्यातील पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पंतप्रधान मोदींचे आगमन होताच काँग्रेसचे काही कार्यकर्ते विमानतळाच्या दिशेने जात होते, त्यापैकी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यानंतर पीएम मोदी निघाल्यानतंर काळे फुगे विमानतळापासून 5 किमी अंतरावर असलेल्या सुरमपल्ली इथून हवेत उडवण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्ते राजीव, रवी प्रकाश यांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका बांधकामाधीन इमारतीच्या छतावरून फुगे उडवण्यात आलं होतं. मात्र तोपर्यंत पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरने विमानतळावरून उड्डाण केलं होतं. पीएम मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ हवेत उडणारे फुगे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत.

कृष्णा जिल्ह्याचे डीसीपी विजय पाल यांनी सांगितले की, या प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून उर्वरित लोकांनाही लवकरच अटक करण्यात येईल.