'नरेंद्र मोदी सरेंडर मोदी आहेत', राहुल गांधींची बोचरी टीका

भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Updated: Jun 21, 2020, 04:42 PM IST
'नरेंद्र मोदी सरेंडर मोदी आहेत', राहुल गांधींची बोचरी टीका title=

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. हे ट्विट करताना राहुल गांधींनी जपान टाईम्सनं मोदींच्या रणनितीवर लिहिलेला लेख जोडला आहे. 

याआधी शनिवारीही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भारताचा भूभाग चीनला देऊन शरणागती पत्करल्याचा आरोप केला होता. सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधानांनी चीनचं लष्कराने भारताच्या भूभागात घुसखोरी केली नसल्याचं मोदी म्हणाले होते. यानंतर राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

'पंतप्रधानांनी चीनच्या आक्रमणापुढे शरणागती पत्करली आणि भारताचा भूभाग चीनला देऊन टाकला. तो भूभाग चीनचा होता, मग आपले जवान शहीद का झाले? जवान नेमके कुठे शहीद झाले?; असे प्रश्न राहुल गांधींनी विचारले होते.

राहुल गांधींनी केलेल्या या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. राहुल गांधींनी भारत-चीन संघर्षावर गलिच्छ राजकारण सोडावं, असं अमित शाह म्हणाले होते. तसंच वाद वाढल्यानंतर पंतप्रधान कार्यालयालाही स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. 

काय म्हणाले होते मोदी?

भारत-चीन यांच्यात सीमेवर झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठीकत बोलत असताना भारताच्या भूभागात घुसखोरी झाली नाही, तसंच भारतीय लष्कराची कोणतीही छावणी ताब्यात घेण्यात आली नाही. सीमेवरची गस्त अधिक चांगली केल्यामुळे लष्कराला काय होतंय, हे योग्य वेळी कळत आहे. त्यांचा वारंवार अटकाव केला जात असल्यामुळे तणाव वाढणं स्वाभाविक आहे , असं मोदी म्हणाले होते. 

पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून त्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. 'पंतप्रधानांनी गलवान खोऱ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. गलवान खोरे भारताचा हिस्सा नाही का? चीनने गलवान खोऱ्यावर सांगितलेल्या ताब्यावर सरकार पुढे येऊन बोलत का नाही? चीनचं लष्कर जर तिकडे असेल, तर ही घुसखोरी होत नाही का? पॅनगॉंग त्सो भागात झालेल्या घुसखोरीबद्दल सरकार शांत का आहे?,' असे प्रश्न काँग्रेसकडून विचारण्यात आले. 

पंतप्रधान कार्यालयाचं स्पष्टीकरण

दरम्यान हा वाद वाढल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा खोडकर पद्धतीने अर्थ काढला गेला, असं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं.