चीनच्या धमक्यांनंतरही नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्या, विमानतळावर उतरताच चीन आणखीनच चिडला

तैवानमुळे सध्या दोन महासत्ता समोरासमोर आल्या आहेत

Updated: Aug 2, 2022, 09:06 PM IST
चीनच्या धमक्यांनंतरही नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्या, विमानतळावर उतरताच चीन आणखीनच चिडला title=

Nancy Pelosi : तैवानमुळे सध्या दोन महासत्ता समोरासमोर आल्या आहेत. अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आज तैवानला पोहोचल्या आहेत. नॅन्सी पेलोसी रात्री 8.15 च्या सुमारास तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत. चीनच्या सर्व धमक्या आणि निदर्शनानंतर अमेरिकन सिनेटरला कडेकोट सुरक्षा देण्यात आली आहे. 

तैवानमधील अमेरिकेच्या हितसंबंधानंतर चीन संतापला आहे. चीनने अमेरिकेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. 25 वर्षानंतर अमेरिकेच्या एखाद्या अधिकी तैवान दौऱ्यावर पोहोचला आहे. यादरम्यान तैवान देखील युद्धजन्य स्थितीचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे.

पेलोसी यांचे विमान तैपेईच्या विमानतळावर उतरताच चीन आणखीनच चिडला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की अमेरिका एक धोकादायक जुगार खेळत आहे आणि आता या भयानक परिणामांची जबाबदारी अमेरिकेला घ्यावी लागेल.

चिनी सरकार आणि लष्करी अधिकार्‍यांच्या इशाऱ्यांना न जुमानता अमेरिकन हवाई दलाची विमाने C-40Cआणि SPAR19 विमाने तैवानमध्ये पोहोचली. त्यांनी चिनी हवाई क्षेत्रात प्रवेश केला. माध्यमांच्या वृत्तानुसार, नॅन्सी पेलोसी या विमानाने तैवानला पोहोचल्या आहेत.

नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्याची बातमी येण्यापूर्वी, जगातील सर्वात जास्त ट्रॅक केलेले विमान यूएस एअर फोर्सचे जेट होते. या जेटने क्वालालंपूर येथून उड्डाण केले. इंटरनेट युजर्स  नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावर असताना त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. Flightradar24 या लोकप्रिय विमान-ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, अलीकडे पर्यंत, सुमारे 3 लाख युजर्स SPAR-19 ला फॉलो करत होते. 

चीनची धमकी, अमेरिकेचा पलटवार

अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवर चीन टीका करत आहे. चीन याकडे स्वतःसाठी आव्हान म्हणून पाहत आहे. चीनच्या अनेक भागात अमेरिकेविरोधात निदर्शनेही होत आहेत. चीनने अमेरिकेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनेही पेलोसी यांची भेट हा त्यांचा निर्णय असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. पेलोसीच्या प्रस्तावित आशिया दौऱ्यात तैवानचा समावेश नव्हता. या दौऱ्यात त्यांनी तैवानला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे वाद?

चीन आणि तैवान यांच्यातील वाद नवीन नाही. चीन तैवान आपल्याच देशाचा भाग असल्याचं सांगत आहे. दुसरीकडे तैवान स्वतंत्र देश असल्याचं सांगत आहे. चीन आणि तैवानमध्ये दुसऱ्या महायुद्धापासून वाद सुरु आहे. 

तैवानचे स्वतःचे संविधान आहे आणि निवडून आलेले सरकार देखील आहे. तैवान हे चीनच्या आग्नेय किनार्‍यापासून सुमारे 100 मैल अंतरावर आहे. सध्या जगातील केवळ 13 देश तैवानला स्वतंत्र सार्वभौम आणि स्वतंत्र देश मानतात.