Mysore Darbhanga Express Accident: तामिळनाडूमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण ट्रेन अपघात झाला. बिहारला जाणाऱ्या बागमती एक्सप्रेस ट्रेनने ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर ट्रेनचे 12 डब्बे रुळावरुन घसरले. एक्सप्रेस ट्रेनने ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला एवढ्या जोरात धडक दिली की एक्सप्रेस ट्रेनमधील काही डब्यांनी पेट घेतला. या दुर्घटनेमध्ये 20 प्रवासी जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रेन मैसूरवरुन पेरम्बूरमार्गे बिहारमधील दरभंगाला जात होती.
बागमती एक्सप्रेसने तिरुवल्लूरजवळच्या कवारप्पेट्टई रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी रुग्णवाहिका आणि राष्ट्रीय बचाव दल म्हणजेच एनडीआरएफच्या तुकड्याही पाठवण्यात आल्या आहेत.
रेल्वे अपघाताबद्दल दक्षिण रेल्वेने अधिक माहिती देताना, "मैसूरहून दरभंगाला जाणारी ट्रेन क्रमांक 12578 (एमव्हाएस-डीबीजी) या ट्रेनचे सहा डब्बे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका मालगाडीला धडक दिल्याने ट्रॅकवरुन खाली उतरले. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. काहीजण जखमी झाले आहेत. वैद्यकीय मदतीबरोबरच मदतकार्य करणारी टीम चेन्नई सेंट्रलवरुन दुर्घटनास्थळी पाठवण्यात आली आहे," असं सांगितलं.
या अपघातानंतर रेल्वेने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. ते खालीलप्रमाणे : -
हैंसमस्तीपुर - 06274-232131, 8102918840
दरभंगा - 06272-234131, 8210335395
दानापुर - 9031069105, 9031021352
पं.दीन दयाल उपाध्याय जंक्शन - 7525039558, 8081212134
बरौनी - 8252912043
चेन्नई कंट्रोल - 044-25330952, 044-25330953
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या दुर्घटनेनंतर आपल्या सरकारी अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्याचे आणि मदतकार्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य सचिव एन. मुरुगानंदम आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदतकार्य करण्यासाठी घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. स्टॅलिन यांनी तिरुवल्लूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबरच दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जखमी प्रवाशांसाठी आरोग्य विषय सेवा आणि मूलभूत सेवा देण्यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. तसेच मतदार्याचा वेग वाढवण्यासही मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सांगितलं आहे. अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी दुर्घटना झालेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या रुग्णालयांमध्ये सर्व आवश्यक यंत्रणा आणि सेवा उपलब्ध आहेत की नाहीत याची चाचपणी करुन नसलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेत.
गुरुवारी बिहारमधील कटिहार येथ एका ट्रेनचा रात्रीच्या वेळेस अपघात जाला होता. सुधानी-बारासोई स्टेशनदरम्यान न्यू जलपायगुडीवरुन कटिहारला जाणाऱ्या ट्रेनचा डब्बा ट्रॅकवरुन उतरला होता. या अपघातामुळे एक मार्गिका अनेक तास ठप्प झाली होती.