मुंबई : देशात सध्या जणू घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. विजय, मल्या, निरव मोदी यांच्या घोटाळ्यांच्या चर्चा अद्याप ताज्या असतानाच आणखी एका घोटाळ्याची त्यात भर पडली आहे. हा घोटाळाही थोडाथोडका नव्हे तर, तब्बल ४ हजार कोटींचा असून, यात एका एका खासगी कंपनीच्या ३ संचालकांना पोलिसांनी ताब्यत घेतल्याचे वृत्त आहे.
हा घोटाळाही बॅंकेशी संबंधीतच
सूत्रांकडील माहितीनुसार, हा घोटाळाही बॅंकेशी संबंधीतच आहे. पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड नावाच्या कंपनीने ग्राहकांना तब्बल ४००० कोटी रूपयांना चुना लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भंवरलाल भंडारी, प्रेमल गोरागांधी आणि कमलेश कानूनगो अशा तिघांना आर्थिक गुन्हे अन्वेशन विभागाने ताब्यात घेतले आहे. या तिघांनाही शुक्रवारी फसवणूक, ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि गुन्ह्याचा कट रचने या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. या कंपनीविरोधात अॅक्सिस बॅंकेने २५० कोटी रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
कंपनीला आर्थिक मदत करणाऱ्या २० देणेदारांपैकी एक अॅक्सिस बॅंकही होती. ज्या लोकांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर बॅंकेच्या फोर्ट स्थित शाकेत बनावट इनवॉईस आणि बोगस कपन्यांच्या माध्यमातून छेडछाड केलेली बिले जमा केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणात बॅंक अधिकारी आणि आरोपी यांच्यात संगणमत असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली नाही. अॅक्सिस बॅंकेच्या तक्रारीत अमिताभ पारेख, राजेद्र गोठी, देवांशु देसाई, किरण पारेख आणि विक्रम मोरडानी यांची नावेही आहेत. अमिताभ पारेख याचे २०१३मध्ये निधन झाल्याचे समजते. तर, पोरेख अल्यूमिनेक्स विरोधात स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसीज बॅंकेने केलेल्या तक्रारीनुसार सीबीआय आगोदरपासूनच चौकशी करत आहे. आरोप आहे की ही कंपनी रियल स्टेट डेव्हलपर्सचा फंड डायव्हर्ट करत होती.
पोलिसांनी सूत्रांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीने पहिल्यांदा अॅक्सिस बॅंकेकडून १२५ कोटी रूपयांची तीन अल्पमुदतीची कर्जे घेतली. या कर्जाची परतफेड करून कंपनीने बॅंकेचा विश्वास संपादन केला. २०११मध्ये पारेखने अॅक्सिस बॅंकेतून १२७,५ कोटी रूपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी त्याने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक झाल्याची कागदपत्रेही जोडली. प्रत्यक्षात मात्र अशी कोणतीच बैठक झाली नसल्याचे पुढे येत आहे. बॅंकेने कंपनीला कच्चा माल आणि काही उपकरणे (यंत्रे) खरेदी करण्यासाठी कर्ज दिले होते.
दरम्यान, पारेख याने कंपनीला कर्ज स्वरूपात मिळालेले पैसे आपल्या व्यक्तिगत खात्यावर वळवले. तसेच, कंपनीने कच्चा माल आणि यंत्रे खरेदी केल्याची खोटी बिलेही बॅंकेला सादर केली. या बिलांवर जी यंत्रे खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. ती सर्व बिले आणि कागदपत्रे बनावट निघाली. इतकेच नव्हे तर, कंपनीने ज्या कंपनीला माल विकल्याची बिले दाखवली ती बिलेसुद्धा बनावटच होती.