मुंबई : पूराच्या पाण्याचा तडाखा बसलेले बिहारमधील २० जिल्हे अद्यापही पुरेसे सावरले नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांना देशभरातून मदत येत आहे. महाराष्ट्र भाजपनेही बिहार भाजपकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चेक स्वरूपात रक्कम दिली.
दरम्यान, चेक लिहीताना अक्षरी रक्कम आणि संख्येतील रक्कम यात घोळ झाल्यामुळे हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. मुंबई येथे शनिवारी (१६ सप्टेंबर) झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपने बिहार भाजपच्या नेत्यांकडे पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी आर्थिक स्वरूपातील मदतीचा चेक दिला. हा चेक स्विकारण्यासाठी कार्यक्रमात बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी मोठ्या प्रेमपूर्वकपणे हा चेक स्विकारला. मात्र, या चेकवरील एका मोठ्या चुकीमुळे हे प्रकरण सोशल मीडियात चांगलेच गाजले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही मग या कार्यक्रमावर टीका केली आणि 'नकली कार्यक्रम' असे ट्विट केले.
चेक सुपूर्त करताना फोटो काढण्यासाठी नेत्यांनी आपल्या खास पोज दिल्या. चेकही सर्वांना दिसेल अशा पद्धतीने धरण्यात आला. फोटो काढण्याच्या नादात नेतेमंडळींचे चेकवर लिहीलेल्या रकमेच्या तपशीलाकडे लक्षच गेले नाही. चेक लिहीताना गोंधळ असा झाला होता की, चेकवर अक्षरात 'एक कोटी वीस लाख रूपये मात्र' असे लिहीले होते. परंतु, संख्येत मात्र, १,२५,००,००० (एक कोटी २५ लाख), असा आकडा दिसत होता. त्यामुळे पूरग्रस्तांना नेमकी किती रकमेची मदत दिली हे समजू शकले नाही.
Such a big fraud event! Mumbai BJP chief handing ovr cheque worth of"One Cr Twenty Lakhs"& 1,25,00,000 to Bihar BJP chief & central minister pic.twitter.com/WfydNUm83q
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) September 16, 2017
Is it "One Crore Twenty Lakhs Only" or "1,25,00,000"? Bhakts,Any idea? pic.twitter.com/sWm1S2xEnp
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) September 16, 2017
दरम्यान, मुंबईचे भाजप प्रदेशाध्यक्ष अशीष शेलार यांनी हा फोटो सर्वात आधी ट्विट केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि बिहारचे भाजपाध्यक्ष नित्यानंद राय यांनीही हा फोटो रिट्विट केला. मात्र, चेक लिहीताना झालेली गफलत तेजस्वी यादव यांनी पकडली आणि त्यांनी या कार्यक्रमावर 'नकली कार्यक्रम' असे ट्विट करून टीका केली.