BJP Leader Brother Kidnaps Assaults Cop: महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) सागरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथील भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्याच्या भावाने पोलिस कर्मचाऱ्याचं अपहरण करुन त्याचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार हॉर्न वाजवत असलेल्या या व्यक्तीला पोलिसाने हटकलं असता संतापालेल्या या व्यक्तीने पोलिसाचेच अपहरण केले.
बुधवारी चंद्रहास उर्फ हल्लू डांगी नावाच्या व्यक्तीने सहाय्यक पोलीस निरिक्षक रामलाल अहिरवार यांचं अपहरण केलं. चंद्रहास हा भाजपाच्या स्थानिक नेत्याचा भाऊ आहे असं फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृ्त्तात म्हटलं आहे. गुर्जहमार पोलीस स्थानकामध्ये तैनात असलेले रामलाल हे बसस्थानकामध्ये ड्युटीवर असतानाच त्याचं अपहरण करण्यात आलं. बसस्थानकावर चंद्रहास हा वारंवार आपल्या गाडीचा हॉर्न वाजवत होता. पोलिसांच्या सायरनप्रमाणे असलेल्या हा हॉर्न वाजवू नये असं रामलाल यांनी चंद्रहासला सांगितलं. यावरुनच दोघांमध्ये बाचाबाची झाली.
या बाचाबाचीनंतर चंद्रहासने रामलाल यांना बळजबरीने आपल्या गाडीमध्ये बसवलं आणि तिथून पळ काढला. पोलिस निरिक्षकाचेच दिवसाढवळ्या अपहरण झाल्याने रामलाल यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांची एकच तारंबळ उडाली. काही कळण्याच्या आतच चंद्रहासची गाडी घटनास्थळावरुन वेगाने निघून गेली. त्यानंतर पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरु केला.
चंद्रहास रामलाल यांना बारकोटी गावामध्ये घेऊन गेला. चंद्रहासने रामलाल यांचा छळ केला, त्यांना मारहण केली. त्यानंतर चंद्रहासने रामलाल यांना तिथेच सोडून घटनास्थळावरुन पळ काढला. पाठलाग करणारे पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना रामलाल जखमी अवस्थेत आढळून आले. या प्रकरणामध्ये चंद्रहासविरोधात सरकारी कामातील कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामलाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे कलम 353, 186, 332, 365 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"आम्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहोत. आरोपीला मद्यपमानचं व्यसन आहे. तो बाराकोटी गावातील असला तरी माकरोनी गावात वास्तव्यास आहे. चंद्रहासचे कुटुंबिय या परिसरामध्ये खासगी बस सेवा चालवतात," अशी माहिती गुर्जहमार पोलीस स्थानकाचे मुख्याधिकारी ब्रिजमोहन कुशावाँह यांनी दिली. आरोपी हा भाजपा नेते राजकुमार बाराकोटी यांचा भाऊ असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. जिल्हा पंचायतीमध्ये राजकुमार यांनी 2000 साली उपाध्यक्षपद भूषवलं आहे.