कार, बाईक अन् 1.90 कोटी रुपयांचा विमा; भावाच्या हत्येसाठीचा प्लॅन ऐकून पोलिसही चक्रावले

MP Crime : मध्य प्रदेशात एका भावाने पैशांसाठी दुसऱ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या हत्येसाठी आरोपीने तीन महिने योजना आखल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 2, 2023, 03:24 PM IST
कार, बाईक अन् 1.90 कोटी रुपयांचा विमा; भावाच्या हत्येसाठीचा प्लॅन ऐकून पोलिसही चक्रावले title=

Crime News : मध्य प्रदेशच्या (MP Crime) ग्वालेरमध्ये एका व्यक्तीचा चुलत भावाने निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हत्येपूर्वी आरोपीने आखलेला प्लॅन ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. ग्वाल्हेरमध्ये (gwalior) चुलत भावाने आधी हत्या करण्यात आलेल्या भावाला बाईक आणि कार घेऊन दिली होती. त्यानंतर भावाचा 1.90 कोटी रुपयांचा विमाही काढला. या सगळ्या नंतर विम्याचे पैसे मिळवण्यासाठी चुलत भावाने साथीदारांसह त्याचा खून करुन टाकला. पोलिसांच्या तपासात ही सगळी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (MP Police) याप्रकरणात आरोपींना अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ग्वाल्हेरच्या मुरार भागात राहणारे जगदीश जाटव यांचा मृतदेह 19 ऑक्टोबर रोजी शीतला माता मंदिर रोडवरील शेतात सापडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी मृत जाटव यांचे कॉल डिटेल्स काढले. यामध्ये जाटव यांना मृत्यूपूर्वी नऊवेळा फोन आला होता अशी माहिती समोर आली. जाटव हे ज्याच्यासोबत बोलत होते पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यानंतर पोलीस तपासात तो फोन चोरीला गेल्याची माहिती समोर आली.

कॉल डिटेल्सवरून पोलिसांना माहिती मिळाली की, मृत्यूपूर्वी त्याने याच क्रमांकावर त्याच्या मोबाईलवर 9 वेळा कॉल केला होता. मृत व्यक्तीने ज्या फोनवर 9 वेळा बोलले त्या फोनचा तपशील पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली. पोलिस ज्या क्रमांकावर शोध घेत होते, त्याच क्रमांकावर दुसऱ्या व्यक्तीचेही सातत्याने बोलणे होत असल्याचे आढळले. ज्या मोबाईल क्रमांकावर मृताचे 9 वेळा बोलणे झाले तो मोबाईल चोरीला गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मात्र जाटव व्यतिरिक्त चोरीच्या मोबाईलवर जो फोन करत होता ती व्यक्ती मृताचा चुलत भाऊ अरविंद असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांना हा पुरावा मिळताच त्यांच्या मनात अरविंद विरोधात शंका निर्माण झाली. मृतकाचा चुलत भाऊ अरविंद जाटव याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जाटवच्या हत्येसाठी गेल्या तीन महिन्यांपासून अरविंद योजना आखत होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान अरविंदने सांगितले की, जगदीश जाटव हा जगात एकटाच होता आणि याच गोष्टीचा फायदा घेतला. अरविंदने त्याच्या दोन मित्रांसह जगदीशला कार आणि बाईक घेऊन दिली. यानंतर या दोन्ही वाहनांचा विमाही काढण्यात आला. एका योजनेअंतर्गत जगदीश जाटव यांनी पंजाब नॅशनल बँकेत 50 लाख रुपयांचा विमा फक्त 3500 रुपयांमध्ये मिळवला. यानंतर अरविंदचे साथीदार अमर आणि बलराम यांनी मिळून जगदीश जाटव याचा रिलायन्स कंपनीत एक कोटी रुपयांचा विमा उतरवला.

यासोबतच एचडीएफसी बँकेच्या ग्रुप पॉलिसीअंतर्गत त्यांना 40 लाख रुपयांचा विमाही मिळाला. हत्येपूर्वी जगदीश जाटव यांचा एकूण एक कोटी 90 लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला होता. हे विम्याचे पैसे मिळवण्यासाठी अरविंदने त्याचे साथीदार अमर आणि बलराम यांच्यासोबत जगदीश जाटव यांच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणे अरविंदने आधी जगदीशला नशेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. यानंतर अरविंदने साथीदारांसह जगदीशच्या छातीवर आणि डोक्यावर हातोड्याने अनेक वार केले. यातच जगदीशचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी जगदीशचा मृतदेह शेतात फेकून दिला, अशी माहिती ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक राजेश सिंह चंदेल यांनी दिली.