स्वप्नात दिसू लागला मृत्यू झालेला मुलगा; शेजाऱ्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या आईने शेवटी गुन्हा केला कबुल

MP Crime News : मध्य प्रदेशात एका आईने पोटच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल सहा महिन्यांनी मुलाच्या हत्येचा गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र आईने मुलाच्या हत्येची कहाणी ऐकून सर्वानाच धक्का बसला आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 7, 2023, 03:04 PM IST
स्वप्नात दिसू लागला मृत्यू झालेला मुलगा; शेजाऱ्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या आईने शेवटी गुन्हा केला कबुल title=

Crime News : मध्य प्रदेशात (MP Crime) एका निर्दयी आईने पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका महिलेने शेजाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवताना पाहिल्यानंतर 3 वर्षाच्या मुलाला टेरेसवरून फेकून मारून टाकलं होतं. मात्र महिलेने अपघाताची कहाणी सांगून कुटुंबीयांना गोंधळात टाकले होते. घाबरलेल्या आईने तिचे पाप लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर एके दिवशी तिने पतीसमोर आपला संपूर्ण गुन्हा कबूल केला. हे सगळं सत्य ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमिनच सरकली. पोलिसांनी (MP Police) महिलेला अटक केली आहे.

3 वर्षाच्या मुलाच्या हत्येची कहाणी अखेर समोर आल्याने कुटुंबापासून ते पोलिसांपर्यंत सर्वांनाच जबर धक्का बसला. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील थाटीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारामई कॉलनीत राहणारे ध्यानसिंह राठौर हे मध्य प्रदेश पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत आहेत. ज्योती राठौरसोबत ध्यानसिंहचा विवाह 2017 मध्ये झाला होता. पत्नी ज्योती आणि दोन मुलांसह ध्यानसिंह राठौर आनंदात राहत होते. पत्नीला घरी बसून कंटाळा येत होता म्हणून ध्यानसिंहने ज्योतीला घराखाली दुकानही उघडून दिलं होतं. त्यातून तिला उत्पन्नही मिळत होतं.

दरम्यान, ज्योती हळूहळू दुकानात रमू लागली. पण अचानक ज्योतीने पतीला सांगितले की दुकानात बसणे योग्य वाटत नाही त्यामुळे आता दुकान बंद कर असे सांगितले. त्यानंतर ध्यानसिंहने दुकानातील सगळं सामान संपू दे मग बंद करु असे सांगितले. त्यानंतर 28 एप्रिल 2023 रोजी रात्री 8.15 च्या सुमारास ज्यातोची मुलगा जतिन घराच्या छतावरून पडून जखमी झाला. जतिनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना जतीनचा मृत्यू अपघातामुळे झाला असेच वाटत होतं.

मात्र मुलाच्या मृत्यूनंतर ज्योतीचे वागणं अचानक बदलू लागलं. रात्री झोपेतून ती अचानक उठून बसू लागली. मुलाच्या मृत्यूचा तिला मोठा धक्का बसला होता. दिवसेंदिवस तिची प्रकृती ढासळू लागली. रात्री झोपेत ज्योतीच्या स्वप्नात तिचा मुलगा जतीन येऊ लागला. जतीनचा आत्मा घरात कुठेतरी भरकटतोय असे ज्योतीला कायम वाटत होतं. त्यामुळे एके दिवशी तिने पोलीस हवालदार असलेल्या पतीसमोर आपला गुन्हा कबूल केला. रागाच्या भरात मुलाला छतावरून ढकलून दिल्याचे ज्योतीने ध्यानसिंहला सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी ज्योती राठोडला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि घटनेचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ज्योती पतीप्रमाणे पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला.ज्योतीने सांगितलेल सत्य ऐकून ध्यानसिंग आणि पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. 

पोलिसांच्या चौकशीत ज्योतीचे शेजारी राहणाऱ्या उदय इंदोलियासोबत तिचे विवाहबाह्य संबंध होते असे समोर आले. 28 एप्रिल रोजी रात्री ज्योती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी टेरेसवर गेली होती. त्यावेळी जतीनसुद्धा तिच्या मागे गेला. जतिनने ज्योतीला तिच्या प्रियकराच्या मिठीत पाहिले. त्यानंतर ज्योतीला भीती वाटत होती की तिचा मुलगा पतीसमोर त्यांचे प्रेमप्रकरण उघड करेल. या भीतीने तिने जतीनला छतावरून फेकून दिले.