मुस्लिम मुलासोबत पळून गेल्यानं संतप्त वडिलांनी पोलीस ठाण्यातच केले अंत्यसंस्कार; तिच्यावर पांढरा कपडा टाकून...

MP News : मध्य प्रदेशच्या नाहरगड पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पोटच्या मुलीचे वडिलांनी जीवंतपणीच अंत्यसंस्कार केले आहेत. मुलीने मुस्लीम तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 26, 2023, 03:17 PM IST
मुस्लिम मुलासोबत पळून गेल्यानं संतप्त वडिलांनी पोलीस ठाण्यातच केले अंत्यसंस्कार; तिच्यावर पांढरा कपडा टाकून... title=

MP News : गेल्या काही दिवसांपासून देशभरात धर्मा धर्मात तेढ निर्माण होतील अशी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेकांकडून सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन करण्यात येत असलं तरी वारंवार हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अशातच मध्य प्रदेशमधून (MP Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये हिंदू तरुणीने मुस्लिम तरुणासोबत प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या वडील आणि कुटुंबीयांनी जिवंत मुलीचे पोलीस (MP Police) ठाण्यातच अंत्यसंस्कार केले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नाहरगड पोलीस ठाण्यातील असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाहरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणीने घरातून पळून जाऊन मुस्लिम तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नाहरगड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर तरुणी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. मुलगी पोलीस ठाण्यात आल्याचे कळताच कुटुंबियसुद्धा तिथे दाखल झाले. मुलीच्या वडिलांनी आणि कुटुंबियांनी हा विवाह तोडून घरी परतण्याची विनंती केली होती. मात्र मुलीने आपला निर्णय बदलला नाही.

त्यानंतर संतापलेल्या वडिलांनी आणि कुटुंबियांनी मुलीवर पोलीस ठाण्यातच अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या नातेवाईंकांनी तिच्या अंगावर पांढरे कापड टाकत तिला हार घातला. त्यानंतर "ही मुलगी मुस्लिम तरुणासोबत पळून गेली आहे आणि हिने हिंदू समाजाची बदनामी केली आहे. त्यामुळे ही मुलगी आमच्या कुटुंबियांसाठी मृत पावलेली आहे. ही मुलगी आमच्यासाठी संपलेली आहे," असे तिच्या नातेवाईकाने म्हटलं.

लेकीनं प्रेमविवाह केल्यानं आई वडिलांची रेल्वेखाली आत्महत्या

लेकिनं प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी आयुष्य संपवल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये घडला होता. आई वडिलांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी जावयाच्या दारसमोरच सरण रचतं दोघांवर अंत्यसंस्कार केले होते. नाशिक जिल्ह्यातील  इगतपुरी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली होती. जावयाच्या घराबाहेर मुलीच्या नातेवाईकांची तुफान गर्दी झाली होती. घटनास्थळी सुरक्षा जवानांनी  धाव घेत या गर्दीवर नियंत्रण मिळवले होते. मुलीने प्रेम विवाह केल्यामुळे आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.

त्यानंतर गावातील तरुणांनी आणि संतप्त नातेवाईकांनी दोघांचेही मृतदेह मुलाच्या घरासमोरच जाळून अंत्यसंस्कार केले. मुलाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करत मुलीने प्रेम विवाह केल्याने त्यांचा निषेध केला. इगतपुरी तालुक्यातील भरविर परिसरात या प्रकारामुळे परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.