Crime News : मध्य प्रदेशात (MP Crime) गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सुरुवातीला वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलीने हे टोकाचं पाऊल उचचलं जात असल्याचे म्हटलं होतं. कुटुंबियांनाही तसंच काहीसं वाटत होतं. मात्र मुलीचा मोबाईल (Instagram) तपासल्यानंतर एक खळबळजनक सत्य आलं आहे. पोलिसांनी (MP Police) याप्रकरणी एका पुजाऱ्याला अटक केली आहे. मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील एका गावातील मुलीच्या आत्महत्येकडे सुरुवातीला घरगुती कारण समजून कुटुंबाने दुर्लक्ष केले होते. मात्र तिचा मोबाईल असता असता मुलीच्या आत्महत्येचे खरं कारण उघडकीस आले आहे. गावातील एक पुजारी त्या मुलीला त्रास देत होता आणि तिला सतत धमक्या देत होता. मृत मुलीच्या इन्स्टाग्राम चॅटिंगवरून ही बाब समोर आली आहे. मुलीच्या कुटुबियांनी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली तक्रार नोंदवली. पोलिसांनी पुजाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करत त्याला अटक करून तुरुंगातही पाठवण्यात आले आहे.
29 ऑगस्ट रोजी 16 वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलीच्या वडिलांची सतत खालावत चाललेली तब्येत यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली होते. या कारणावरून मुलीने आत्महत्या केली असावी, असे कुटुंबीयांना वाटत होते. आयुष्य संपवण्यापूर्वी मुलीने कोणाला काहीच नव्हतं सांगितले. दोन दिवसांनी जेव्हा कुटुंबियांनी मुलीचा मोबाईल तपासला आणि इन्स्टाग्राम चॅटिंग तपासले तेव्हा त्यांना धक्काच बसला. गावातील पुजारी पवित्रा सितोके याच्याशी चॅटिंग केल्याचे समोर आले. या चॅटिंगमध्ये पुजारी अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ करून धमकावत होता. पुजाऱ्याने धमक्या आणि शिवीगाळ केल्यामुळे मुलगी तणावात होती आणि तिने आत्महत्या केली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेच्या दोन दिवसांनंतर आम्ही मुलीचा मोबाईल फोन तपासला तेव्हा आम्हाला कळले की मंदिराचे पुजारी पवित्रा सितोके याने तिला खूप धमकावले होते. शिवीगाळ केली होती. त्याने तिला इतके घाबरवलं होतं की मुलीला विचार करण्याची संधी मिळाली नाही, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.
आरोपी हा गावातील पुजारी होता. त्याने सोशल मीडियावर त्याचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले होते. एका फोटोमध्ये आरोपी हातात बंदूक घेतलेला दिसत आहे. आरोपीने इंन्स्टाग्रामवर चॅटिंग करताना मुलीसोबत अश्लील चॅटिंग केली होती. आरोपी पुजारी असला तरी त्याची कृती समाजकंटकांसारखीच आहे, असे मुलीच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.