MP Congress Youth Leader Punished In Mecca: मध्य प्रदेशमधील निवाडी जिल्ह्यात राहणाऱ्या एक युवक काँग्रेसचा नेता तब्बल 8 महिन्यानंतर मायदेशी परतला आहे. या नेत्याचं नाव रजा कादरी असं असून ते सौदी अरेबियामधून भारतात परतले आहेत. सौदी अरेबियामध्ये पोलिसांनी त्यांना अटक करुन तुरुंगामध्ये टाकलं होतं. इस्लाम धर्मीयांसाठी पवित्र स्थान असलेल्या मक्केमध्ये रजा कादरी यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं पोस्ट दाखवत फोटो काढल्याने त्यांनी शिक्षा अटक झाली. या प्रकरणासंदर्भात रजा यांनी मायदेशी परतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आपल्याला सोडवण्याचं अमिष दाखवून आपल्या घरच्या लोकांकडून फसवणुक करणाऱ्यांनी लाखो रुपये घेतल्याचा दावा रजा यांनी केला आहे. युवा काँग्रेसकडून रजा यांच्या सुटकेसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. काँग्रेसने सौदी अरेबियाच्या गुप्तचर यंत्रणांना अनेकदा ईमेल केले. मात्र याचा काही परिणाम झाला नाही. रजा यांनी सौदी अरेबियामध्ये कोणतंही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही, असा आरोप केला आहे. आपल्याला कसं तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि त्रास देण्यात आला याची माहितीही रजा यांनी दिली आहे.
रजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आजी ही 75 वर्षांची आहे. आम्ही हजला जावं अशी तिची इच्छा होती. तिची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण मक्केला गेले होतो. आमची आजी 2002 साली हज यात्रेला जाऊन आली होती. आम्ही झाशीमधील अल अन्सार टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सकडून 2 लाख रुपयांचं टूर पॅकेज बूक केलं होतं. त्यांनी सौदीमध्ये राहण्यापासून ते खाण्यापर्यंतची सोय त्यांच्याकडूनच केली जाईल असं सांगितलं होतं. आम्ही 21 जानेवारीरोजी भारतामधून रवाना झालो. पुढल्या दिवशी 22 जानेवारी रोजी मक्का शहरामध्ये आम्ही पोहोचलो. आमचा ग्रुप 72 लोकांचा होता. आम्ही येथील ओलायन रॉयल हॉटेलमध्ये वास्तव्यास होतो. हे हॉटेल मक्केच्या मशिदीपासून 1 किलोमीटर दूर होतं. 23 ते 25 जानेवारीदरम्यान मी 3 वेळा बार उमराह (प्रार्थना) करुन आलो. यामुळे माझ्या आजीला फार आनंद झाला होता, असं रजा म्हणाले.
रजा यांनी दिलेल्या माहितीनुसार ते 10 फेब्रुवारी रोजी भारतात परत येणार होते. मी 25 जानेवारीला मक्केच्या मशिदीमध्ये प्रार्थना केली. आमच्या ग्रुपमधील सर्वजण फोटो काढत असल्याने मी सुद्धा 2 फोटो काढले. एक फोटो मी भारतीय राष्ट्रध्वजासहीत काढला आणि दुसऱ्या फोटोमध्ये माझ्या हातात भारत जोडो यात्रेचं पोस्टर होतं. फोटो काढताना विशेष असं काहीच घडलं नाही. मी 26 जानेवारीला सोशल मीडियावर माझे फोटो शेअर केले. हे फोटो माझ्या पक्षातील मोठ्या नेत्यांनीही शेअर केले. मात्र यामुळे माझ्या अडचणी वाढल्या, असं रजा यांनी सांगितलं.
26 जानेवारी आणि 27 जानेवारीदरम्यानच्या रात्री 2 वाजता एक व्यक्ती हॉटेलच्या रुममध्ये आली. आपण व्हिजा कंपनीकडून आलो आहोत असं त्याने मला सांगितलं. माझा आणि त्याचा थोडा वाद झाला आणि मी त्याच्याबरोबर लिफ्टने हॉटेलच्या वरील मजल्यावरुन खाली उतरलो. आम्ही गाऊण्ड फ्लोअरवर पोहोचताच माझा चेहरा काळ्या कपड्याने झाकण्यात आला. मला बेड्या घालण्यात आल्या आणि काही लोक मला घेऊन गेले.
माझ्या चेहऱ्यावरील कापड काढण्यात आलं तेव्हा पोलिसांच्या कपड्यांमधील अनेक लोकांनी मला चाहरी बाजूने घेरलं होतं. मी सौदी अरेबियामधील नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यानंतर ते मला अंधाऱ्या खोलीत घेऊन गेले. त्यांनी माझ्यावर 2 महिने अत्याचार केले, असं रजा म्हणाले. मला या गोष्टीची कल्पना नसल्याने मी चूक केल्याचं सांगत माझ्याकडून झालेली चूक मान्य केली. मी व्हायरल झालेला माझा फोटो सोशल मीडियावरुन काढण्यासही तयार होतो. पोलिसांनी माझ्याकडे देशात आल्यासंदर्भातील कागदपत्रं मागितले, असं रजा म्हणाले. आपण ट्रॅव्हल एजंटला फोन केला. मात्र त्याने आपल्याला प्रतिसाद दिला नाही असं रजा यांनी सांगितलं.
त्यानंतर रजा यांना या ट्रॅव्हल एजंटनेच पोलिसांनी आपली सर्व माहिती दिल्याचं समजलं. मला 2 महिने ढाहबानमधील तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. सकाळी आणि संध्याकाळी मला केवळ ब्रेडचे 2 तुकडे दिले जायचे. पोलिसांनी माझी लाय डिटेक्टर चाचणीही केली. ते मला झोपू देत नव्हते. 2 महिन्यांपासून मी सूर्यही पाहिला नव्हता. मला भारतात परतल्यानंतर मानसोपचारतज्ज्ञाकडे जावं लागलं. मला शुमैशी येथील डिटेंन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी चादरींमध्ये किडे होते आणि खाणंही चांगलं नव्हतं. मला सोडवण्याचं आश्वासन देऊन अनेकांनी माझ्या घरच्यांकडून मोठी रक्कम घेतली. भारतीय दूतावासामधील तनवीर आलम यांनी पासपोर्टच्या कामासाठी 1200 रियाल म्हणजे 26 हजार रुपये घेतले. माझ्याप्रमाणे अनेक भारतीय तिथे अडकून पडले आहेत. त्यांची परिस्थितीही फार वाईट आहे. अडकलेल्या अनेकांनी त्यांच्या एजंट्सनेच अडकवलं आहे, असा दावाही रजा यांनी केला. रजा यांना 99 चाबकाच्या फटक्यांची शिक्षाही देण्यात आली.