मुंबई : देशभरात आज 8 मे निमित्त मदर्स डे दिवस साजरा केला जात आहे. यानिमत्त प्रत्येकाच्याच स्टेटसवर आज आईचा एक सुंदरचा फोटो आणि तिच्याप्रति कृतज्ञतापुर्वक भावनिक शब्द पाहायला मिळतील. याच दिवसानिमित्त आपण आज देशभरात 'मदर ऑफ ट्री' नावाने ओळखल्या जाणाऱ्या 110 वर्षाच्या पद्मश्री विजेता सालुमारदा ठिम्माक्का यांची हिरवीगार कहानी जाणून घेणार आहोत.
कोण आहेत सालुमारदा ठिम्माक्का ?
सालुमारदा ठिम्माक्का या कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एक वृद्ध महिला आहेत. त्यांचे घर रमनगारा जिल्ह्यात आहे. एका रिपोर्टनुसार सालुमारदा ठिम्माक्का यांचा जन्म 1910-1912 या दरम्यान झाला आहे. त्यानुसार त्यांचे वय 110 वर्ष आहे. आतापर्यत त्या फक्त सामान्य महिला होत्या. मात्र त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.
कशा बनल्या 'मदर ऑफ ट्री' ?
शेतात एके दिवशी काम करीत असतानाच सालुमारदा ठिम्माक्का यांना एक गोष्ट सुचली. आपण आज ज्या सावलीत बसून जेवतोय,
ती सावली किती गोड आहे. दररोज हे झाड आपल्यावर किती चांगली छाया पसरवून असते. ही झाडेच तर आपली मुलं नाहीत ना, असे त्यांना वाटायला लागले. पण, त्यांना जाणिव झाली की आपण दुसऱ्याच्या शेतात आहोत मग ही झाडे आपली मुलं कशी?
दरम्यान असेच रस्त्याने चालत असताना त्यांनी झाडे लावण्याचा निश्चय केला. मात्र कुठे झाडे लावायची हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. यावेळी त्या आपल्या झोपडी बाहेर आल्या, त्यावेळी त्यांना समोर रस्ता दिसला. हा रस्ता पाहूनच त्यांनी निश्चय केला माझ्या मुलांची वाटही या रस्त्यातूनच जाते त्यामुळे याचं रस्त्याच्या कडेला झाडे लावायचा निश्चय करत उपक्रमाला सुरूवात केली.
झाडे लावण्यासाठी रोप आणली ती रस्त्याच्या कडेला लावली. मात्र रोप काय पटापट वाढत नव्हती. त्यामुळे ठिम्माक्का यांनी त्या झाडाची काळजी करतानाच त्याच्या शेजारी दुसरे रोप लावले. एक मोठे झाले, दुसरे होऊ लागले म्हणून मग तिसरे लावले. हा सिलसिला असाच सुरू राहीला. पाहता पाहता लागवड केलेल्या ३०० रोपांचे झाडात रुपांतर झाले. डेरेदार बहरलेल्या या वृक्षांमुळे चिंचा, डिंक आणि अन्यही काही फायदे मिळू लागले. रस्त्यांलगत लावलेली ही झाडे जणू मोठे साम्राज्यच बनली. दररोजची मोलमजुरी करीत सुरु असलेला हा उपक्रम त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. दरम्यान एका आजीबाईने इतकी झाडे लावली आणि जगवली अशा बातम्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये आल्या आणि ठिम्माक्का प्रसिद्धीझोतात आल्या होत्या.
सरकार विरोधातही आवाज उठवला
सालुमारदा ठिम्माक्का यांनी आतापर्यत 8000 वृक्षांची लागवड केली आहे. ठिम्माक्का यांनी लावलेली झाडे आता 70 वर्षांची झाली आहेत. इतकचं नाही तर ज्या हायवेवर त्यांनी वृक्षारोपण केले होते. त्या हायवेचे रुद्दीकरण करण्यात येणार होते.या रूद्दीकरणात त्यांनी लावलेली सर्व झाडे मोडण्याचे आदेश दिले होते. मात्र या विरोधात ठिम्माक्का यांनी आवाज उठवत हा निर्णय सरकारला मागे घ्यायला लावला. ठिम्माक्का यांनी वर्षोनुवर्ष या झाडांची आपल्या मुलांप्रमाणे देखभाल केली. सर्व झाडांना एका आईप्रमाणे त्यांनी माया दिली. त्यामुळे त्यांना मदर ऑफ ट्री असे
म्हटले जाते.
पुरस्कार
सालुमारदा ठिम्माक्का यांना 2017 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना वयाच्या107 व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांना हा पुरस्कार झाडांना आईप्रमाणे प्रेम दिल्याबद्दल प्रदान करण्यात आला. ठिम्माक्का यांना सर्वात वृद्ध पर्यावरण कार्यकर्ती मानले जाते. 2020 साली सालुमारदा यांना कर्नाटक सेंट्रल युनिवर्सिटीतर्फे डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली.